शंभर दिवसांत बारामतीसाठी अकराशे कोटी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

बारामती: बारामती शहर आणि तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या जेवढ्या योजना केल्या आहेत, त्या सर्व मिळून दीड हजार कोटींच्या असतील. एका आमदाराला वर्षाला मिळतात 5 कोटी, 5 वर्षाला मिळतात 25 कोटी, तुमच्यासाठी आणलेत, दीड हजार कोटी.
100 दिवसांच्या आत जानाई शिरसाईसाठी 460 कोटी, पशुसंवर्धन विद्यालयासाठी 560 कोटी रुपये असे जवळपास अकराशे कोटी रुपयांची कामे मंजूर केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामती दौर्यावर होते. तालुक्यातील बोरकरवाडी येथे टीसीएस फाउंडेशनच्या सीएसआर निधीतून जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या उजवा कालवा रायझिंग ते बोरकरवाडी तलावपर्यंत करण्यात आलेल्या पाईपलाईनचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडले, त्या वेळी ते बोलत होते.
हेही वाचा – नारायणगाव पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन; स्मार्ट पोलीस स्टेशनचा दर्जा
अजित पवार म्हणाले की, सरकारने लाडक्या बहिणीकडे जास्त लक्ष दिले आहे. यावर आमच्यावर टीका झाली. विरोधकांकडून सांगण्यात आलं की, निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद केली जाईल. आम्ही ही योजना बंद करणार नाही. शेतकर्यांसाठी असणारी वीज चालू ठेवली आहे, याचाही लाभ सर्वांनी घ्यावा.
गरीब वर्गासाठी घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवकरच पुणे विभागात 30 हजार घरांचा कार्यक्रम घेतला आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ते 3 कोटी घरांचा कार्यक्रम घेतला आहे. महाराष्ट्रासाठी 20 लाख घरे मंजूर झाली आहेत. पैकी 5 हजार घरे बारामतीसाठी मंजूर झाली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.