नारायणगाव पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन; स्मार्ट पोलीस स्टेशनचा दर्जा

नारायणगाव : नारायणगाव (ता. जुन्नर) पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून अ++ श्रेणी मिळाली आहे. आयएसओ स्मार्ट पोलीस स्टेशन मानांकनासाठी आवश्यक असलेल्या नियम, अटी व शर्तींचे तंतोतंत पालन केल्यामुळे नारायणगाव पोलीस ठाण्याला ISO 9001:2015 Certified SMART Police Station with Grade A++ मिळाली आहे. स्मार्ट पोलीस स्टेशनचा दर्जा मिळालेले जिल्हा ग्रामीण मधील नारायणगाव हे पहिले पोलीस ठाणे आहे.
मानांकन प्राप्त झाल्याबद्दल नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने उपसरपंच बाबू पाटे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व फौजदार जगदेव पाटील यांचा सत्कार केला. या बाबत अधिक माहिती देताना नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार म्हणाले की, पुणे येथील सोर या संस्थेने 37 निकषांची पाहणी करून पोलीस ठाण्याला 100 पैकी 94 गुण दिले आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ग्रामस्थांनी या कामात मोठे सहकार्य केले. नारायणगाव पोलीस ठाण्याच्या 1977 साली बांधण्यात आलेल्या इमारतीची पडझड झाली होती.
हेही वाचा – वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर सरकारची करडी नजर; फोटो नव्हे, आता व्हिडिओद्वारे होणार कारवाई
वाढलेल्या गुन्ह्यांचा विचार करता ही इमारत अपुरी पडत होती.शासनाच्या वतीने सुमारे 6 कोटी रुपये खर्च करून सर्व सुविधा असलेली नवीन इमारत बांधण्यात आली आहे. नुकताच या सुसज्ज इमारतीत पोलिस ठाण्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे.नवीन इमारतीत पोलीस अधिकारी, फौजदार, पासपोर्ट, बारानिशी, वायरलेस, स्टेशन डायरी आदी विभागासाठी स्वतंत्र खोल्या आहेत. महिला व पुरुष कैद्यासाठी कोठडीची सुविधा आहे. महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह आहे.सर्व खोल्यांमध्ये अद्यावत फर्निचर, पिण्याचे पाणी, सोलर, सर्व विभागात संगणक,इंटरनेट, वायफाय, कॅमेरे आदि सुविधा आहेत.असेही शेलार यांनी सांगितले
दाखल झालेल्या गुन्ह्यापैकी 85 टक्के गुन्ह्यांचा तपास करण्यात यश आले आहे. पायाभूत सुविधा, आद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, कामकाजातील तत्परता, सायबर क्राईम, भौगोलिक परिसर, जनतेचे अभिप्राय, प्रशिक्षित पोलिस दल,पडदे, टेबल, नामफलक, वरिष्ठ अधिकार्यांची अद्यावत माहिती, मुख्य प्रवेशद्वाराजवळ व्हिजिटर रजिस्टर, नागरिकांची सनद व गुणवत्ता धोरणाचा फलक , आपत्कालीन मार्ग, संपर्क क्रमांक, पोलीस ठाण्याचा मुख्य फलक, हद्दीचा फलक यांसह ३७ निकष पूर्ण करून नारायणगाव पोलीस ठाणे परिपूर्ण झाले आहे.
नारायणगाव पोलीस ठाण्याला स्मार्ट पोलीस ठाण्याचा दर्जा मिळाल्याने उपसरपंच योगेश पाटे यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाटे म्हणाले नारायणगावचे पोलीस स्टेशन आता स्मार्ट झाले आहे. ग्रामस्थांना याचा अभिमान आहे. यामुळे आता पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी वाढली आहे.तक्रारदारांना त्रास होणार नाही, गुन्हेगारांना शासन होईल. या साठी तत्परता दाखवली जाईल. अशी नागरिकांची अपेक्षा आहे.