Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

PCMC: पिंपरी-चिंचवडकरांना विषारी पाणी; नागरी आरोग्य धोक्यात!

शिवसेना गटनेते विश्वजित बारणे यांनी प्रशासनाला झापले; महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा सभागृहात खुलासा

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी: पवना नदीतील पाणी धोकादायक पातळीपर्यंत प्रदूषित झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) सभागृहात यावर जोरदार चर्चा झाली. नीटल लॅबोरेटरीजच्या तपासणी अहवालात रावेत बंधारा परिसरातील पाण्यात गंभीर जैविक आणि रासायनिक प्रदूषण आढळल्याने नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाल्याचा मुद्दा शिवसेना शिंदे गटाचे गटनेते विश्वजित बारणे यांनी सभागृहात प्रभावीपणे मांडला. प्रशासनाला त्यांनी अक्षरश: झापले.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना गटनेते विश्वजित बारणे यांनी तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. सभागृहात सादर झालेल्या माहितीनुसार, पाण्यात खालील गंभीर बाबी आढळल्या आहेत: यामध्ये Total Coliform – 1600 MPN/100 ml (मानक 500 पेक्षा तिप्पट जास्त) मलमूत्रजन्य प्रदूषण अत्यंत जास्त प्रमाणात असल्याचे स्पष्ट, Dissolved Oxygen (DO) – 1 mg/l पेक्षा कमी (मानक 5 mg/l), नदीतील जलचर जीवसृष्टी धोक्यात, पाणी ‘मृत अवस्थेकडे’, BOD – 14 mg/l (मानक 3 mg/l), सांडपाणी व सेंद्रिय घाण मोठ्या प्रमाणात मिसळल्याचे संकेत, COD – 76.8 mg/l आणि औद्योगिक व रासायनिक कचऱ्यामुळे पाणी अत्यंत प्रदूषित आहे. तसेच, अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, हे पाणी “Required Limits नुसार अनुपयुक्त” आहे.

हेही वाचा : महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्थेसाठी कृती आराखडा हवा : स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे

आरोग्य व पर्यावरणावर गंभीर परिणाम

पाणी प्रक्रिया आणि संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारच्या प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांमध्ये टायफॉईड, कॉलरा, कावीळ, त्वचारोग, जुलाब यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. तसेच नदीतील ऑक्सिजन कमी झाल्याने जलचर जीवसृष्टीवर गंभीर परिणाम होऊन संपूर्ण पर्यावरणीय संतुलन बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सभागृहात बोलताना विश्वजित बारणे यांनी प्रशासनाला धारेवर धरत अनेक प्रश्न उपस्थित केले. पवना नदीत सांडपाणी किती प्रमाणात सोडले जाते, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत का, तसेच नदी स्वच्छतेसाठी खर्च केलेला निधी नेमका कुठे वापरला जातो, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. “नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. स्वच्छ पाणी देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असा आरोपही त्यांनी केला.

“पर्याय नाही, पण पूर्ण प्रक्रिया करुनच पाणी पुरवठा”: आयुक्त डॉ. सूर्यवंशी

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, बंधाऱ्याच्या वरील भागातील गावांमधून कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळते. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घसरली आहे.ते म्हणाले, “सध्यस्थितीत आपल्याकडे पर्याय नाही. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी घ्यावे लागते. मात्र हे पाणी पूर्णपणे प्रक्रिया करूनच नागरिकांना पुरवले जाते.” पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत आणि पीएमआरडीए क्षेत्रातील गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) उभारणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. हे प्रकल्प सुरू होईपर्यंत नदीत मिसळणारे सांडपाणी ही समस्या कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पवना नदीतील पाण्याच्या गंभीर प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आणि वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सभागृहात झालेल्या चर्चेत महत्त्वाचे मुद्दे समोर आले. शहराला सध्या सुमारे १२० एमएलडी पाण्याची कमतरता भासत असून, बंधाऱ्यातील पाणी प्रदूषित असले तरी पर्याय नसल्याने तेच पाणी घ्यावे लागत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

“पवना नदीतील पाणी इतक्या धोकादायक पातळीपर्यंत प्रदूषित झाले असताना प्रशासनाची निष्क्रियता चिंताजनक आहे. नागरिकांच्या आरोग्याशी असा खेळ अजिबात सहन केला जाणार नाही. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पुरवणे ही महापालिकेची मूलभूत जबाबदारी आहे; त्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात.
– विश्वजित बारणे, गटनेता, शिवसेना, पिंपरी-चिंचवड महापालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button