प्रवाशांना वातानूकुलीत पर्यटनाची संधी, पीएमपीकडून उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांसाठी खास बससेवा

पुणे : सुट्यांमध्ये सहलीचा आनंद घेण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) पर्यटकांसाठी खास पर्यटन बससेवा सुरू केली आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये या वातानूकुतील पर्यटन बससेवेचा पर्यटक, भाविक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या सुरू होताच पुणे जिल्ह्यासह विविध जिल्हे व परराज्यांतून नागरिक पर्यटनासाठी पुण्यात येतात. एतिहासिक, तीर्थक्षेत्रांना भेटी देतात. या वेळी ग्रुपने जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. मात्र, बहुतांश वेळा या पर्यटनस्थाळावर कसे जायचे, वाहन व्यवस्था कोणती, असा प्रश्न उभा राहतो. हीच आवश्यकता लक्षात घेऊन पुणे पीएमपीकडून शहर आणि जिल्ह्यातील पर्यटनस्थळ, तीर्थक्षेत्र, गडकिल्ले, मंदिरे याठिकाणी माफक दरात आणि एसी बसमधून पर्यटन करण्यासाठी पर्यटन बससेवा सुरू केली. त्याला प्रवाशांचा सुट्ट्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पीएमपीकडून आठवड्याच्या प्रत्येक शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही पर्यटन बससेवा सुरू आहे. त्यासाठी स्मार्ट एसी इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून दिली जाते. प्रत्येकी ५०० रुपये तिकिट दर असून, या सर्व बस सकाळी नऊ वाजता सुटणार आहेत.
प्रवाशांना माहिती देण्यासाठी या बसमध्ये गाइड सेवकाची नेमणूक केलेली असते, तसेच ज्या दिवशी बुकिंग केले, त्या दिवशी सदर प्रवास राहत्या घरापासून बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत आणि सायंकाळी पोहोचल्यानंतर राहत्या घरापर्यंत बुकिंग केलेल्या तिकिटावर अन्य मार्गांच्या बसेसमधून प्रवास करता येऊ शकतो. दरम्यान, अल्प प्रतिसाद मिळाला किंवा अपरिहार्य कारणास्तव संबंधित बससेवा रद्द झाल्यास त्या प्रवाशांना इतर दिवशी (आठवड्याच्या शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टी) प्रवास करता येईल.
हेही वाचा – शंभर दिवसांत बारामतीसाठी अकराशे कोटी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मार्ग क्रमांक एक :
हडपसर, स्वारगेट, इस्कॉन मंदिर, श्री क्षेत्र कानिफनाथ गड, मोरगाव गणपती, जेजुरी दर्शन, सासवड, स्वारगेट, हडपसर.
मार्ग क्रमांक दोन :
हडपसर, स्वारगेट, सासवड (सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर) नारायणपूर, (एकमुखी दत्त मंदिर, नारायणेश्वर मंदिर), श्री क्षेत्र म्हस्कोबा मंदिर कोडीत, सासवड, स्वारगेट, हडपसर.
मार्ग क्रमांक तीन :
पुणे स्टेशन, डेक्कन जिमखाना, स्वारगेट, शिवसृष्टी आबेगाव, स्वामी नारायण मंदिर नऱ्हे, कोंढणपूर तुकाईमाता मंदिर, बनेश्वर मंदिर, अभयारण्य, बालाजी मंदिर केतकावळे, स्वारगेट.
मार्ग क्रमांक चार :
पुणे स्टेशन, डेक्कन जिमखाना, पु. ल. देशपांडे गार्डन, खारावडे म्हसोबा देवस्थान, नीलकंठेश्वर पायथा, झपूर्झा संग्रहालय घोटावडे फाटा मार्गे, डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन.
मार्ग क्रमांक पाच :
पुणे स्टेशन, डेक्कन जिमखाना, सिंहगड रोडने खडकवासला धरण, सिंहगड पायथा, गोकुळ फ्लॉवर पार्क गोळेवाडी, पानशेत धरण, डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन.
मार्ग क्रमांक सहा :
पुणे स्टेशन, स्वारगेट, हडपसर रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम हडपसर, स्वारगेट, पुणे स्टेशन.
मार्ग क्रमांक सात :
पुणे स्टेशन, स्वारगेट, वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडे बोल्हाई मंदिर, तुळापूर त्रिवेणी संगम छत्रपती संभाजी महाराज समाधी (वढु बुा.), रांजणगाव गणपती मंदिर, भीमा कोरेगाव विजय स्तंभ, पुणे स्टेशन.
मार्ग क्रमांक आठ :
मार्ग क्रमांक आठ : पुणे स्टेशन, स्वारगेट, इस्कॉन मंदिर रावेत, मोरया गोसावी मंदिर चिंचवड, प्रतिशिर्डी शिरगाव, देहूगाव गाथामंदिर, भंडारा डोंगर पायथा, स्वारगेट, पुणे स्टेशन.
मार्ग क्रमांक नऊ :
स्वारगेट, पौडगाव मार्गे श्री. सत्य साईबाबा महाराज आश्रम हाडशी (कमान), चिन्मय विभूतीयोग साधना ध्यानकेंद्र कोळवण, स्वारगेट.
मार्ग क्रमांक दहा:
स्वारगेट, भोसरी, चाकण, क्रांतिवीर हुतात्मा राजगुरू स्मारक, सिद्धेश्वर मंदिर राजगुरूनगर, श्री क्षेत्र खंडोबा मंदिर निमगाव दावडी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थळ, श्री गजानन महाराज मठ आळंदी, स्वारगेट.
येथे करा बुकिंग…
डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी, मनपा भवन या पास केंद्रांवर. बसच्या आसन क्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास ५ प्रवाशांच्या तिकीट दरामध्ये १०० टक्के सवलत मिळणार, तसेच सिंहगड रोडवरील कृष्णाई वॉटर पार्क आणि लोणावळा रोडवरील वेट अॅण्ड जॉय पार्क येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी बस बुक करता येऊ शकते.