खा. सुळे यांची साखर कारखान्यांच्या राजकारणात उडी; ‘पवार विरुद्ध पवार’ संघर्ष बारामतीत पुन्हा रंगणार
सोमेश्वरनगर: बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आता स्थानिक सहकारी साखर कारखान्यांच्या राजकारणात उडी घेतली आहे. शनिवार (दि. 11) त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातील माळेगाव आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांवर धडकणार असून, व्यवस्थापनाकडे ऊस उत्पादक शेतकर्यांना दिलेल्या 2800 रुपये प्रतिटन या पहिल्या हप्त्याबाबत विचारणा करणार आहेत. या कारखान्यांनी पहिला हप्ता कमी दिल्याची ऊस उत्पादकांची तक्रार आहे.
विधानसभेच्या अपयशानंतर खा. सुप्रिया सुळे यांच्या दौर्याला महत्त्व आले आहे, त्या प्रथमच माळेगाव आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांना भेट देणार आहेत. शरद पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक साखर कारखानदारीत लक्ष घातले होते, आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार घराण्यातील फुटीनंतर सुप्रिया सुळे यांची ही ‘एंट्री’ होत असल्याने बारामतीत पुन्हा एकदा ‘पवार विरुध्द पवार’ संघर्ष पाहायला मिळणार आहे, त्यांच्या दौर्याकडे शेतकर्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
शनिवारी सकाळी सोमेश्वर आणि त्यानंतर त्या माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाशी उत्पादकांना मिळालेल्या पहिल्या हप्त्याबाबत सुळे चर्चा करणार आहेत. माळेगाव कारखान्यात 1985 पासून, तर सोमेश्वर कारखान्यात 1992 पासून शरद पवार यांच्या विचाराचे संचालक मंडळ काम करत होते.
हेही वाचा – ‘जेष्ठ नागरिकांना एक सुरक्षा कवच देणारी ‘आयुष्मान भारत’ योजना’; शत्रुघ्न काटे
शरद पवारांनी हळूहळू ही धुरा अजित पवार यांच्याकडे दिल्यानंतर सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती या स्थानिक सहकारी साखर कारखान्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्णपणे राजकीय पकड बसवलेली आहे, त्यांच्या विचाराचे संचालक मंडळ येथे कार्यरत आहे.
शरद पवारांनंतर साखर कारखानदारीची सर्व सूत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याकडे घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार घराण्यातील फुटीनंतर ही पकड कायम ठेवली आहे. सुप्रिया सुळे यांचा फारसा या स्थानिक साखर कारखानदारीशी संबंध आला नाही, आता स्थानिक राजकारणाची गरज ओळखून सुळे यांनी साखर कारखानदारीत लक्ष घातल्याने पवार घराण्यातील संघर्ष अटळ झाला आहे. खा. सुळे या पहिल्यांदाच सोमेश्वर व माळेगाव कारखान्यांवर ऊस उत्पादकांच्या न्याय्य हक्कासाठी या दोन्ही कारखान्यांवर येत आहेत.
सुप्रिया सुळे यांनी लोकसभेला झालेल्या धावपळीमुळे आता स्थानिक पातळीवर लक्ष केंद्रित केले असून, संघटन वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दोनच दिवसांपूर्वी बारामती तहसील कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने दूध व कांद्याच्या दराबाबत सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते.