आरक्षण आंदोलनातील बलिदान देणाऱ्या आंदोलकांच्या वारसांना MIDC मध्ये नोकरी; सरकारचा मोठा निर्णय
बीड जिल्ह्यात पात्र वारसांची यादी जाहीर; कागदपत्रांची छाननी पूर्ण, नियुक्तीसाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू

बीड : आरक्षण आंदोलनादरम्यान बलिदान देणाऱ्या आंदोलकांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका सदस्याला MIDC मध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राथमिक पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पडताळणीत पात्र ठरलेल्या मृत आंदोलकांच्या वारसांची यादीही जारी करण्यात आली आहे.
हेही वाचा – MPSC पेपरफुटीविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; सुप्रिया सुळेंची सरकारकडे मोठी मागणी
सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बीड जिल्हा प्रशासनाने संबंधित वारसांच्या कागदपत्रांची छाननी पूर्ण केली आहे. पात्र वारसांना MIDC मध्ये अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यासाठी पुढील आवश्यक कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे आरक्षण आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार असून, पात्र वारसांना लवकरच नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.




