आमदार शंकर जगताप यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठान पुणेच्या नियामक परिषदेवर नियुक्ती
खनिजबाधित भागांच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभाग; निधीच्या पारदर्शक वापरावर देणार भर

पिंपरी- चिंचवड | चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठान (डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन – DMF), पुणेच्या नियामक परिषदेवर पदसिद्ध सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म शाखेने याबाबतचे अधिकृत नियुक्तिपत्र जारी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने ५ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार तसेच ११ ऑक्टोबर २०२४च्या अधिसूचनेतील तरतुदींनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील खाणकामामुळे बाधित भागांच्या विकासासाठी आखण्यात येणाऱ्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत आमदार शंकर जगताप यांचा सहभाग राहणार आहे.
जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून खाणकामाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम झालेल्या परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध विकासकामे राबविली जातात. विशेषतः मूलभूत पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, पर्यावरण संवर्धन तसेच नागरिकांच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित कामांसाठी प्रतिष्ठानच्या निधीचा उपयोग केला जातो.
हेही वाचा
‘बिग बॉस २०’चा ग्रँड प्रीमियर दणक्यात; घरात उतरले १६ स्पर्धक, यंदा २ लाइफलाइन्ससह नवा ट्विस्ट!
नियामक परिषद ही जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या कामकाजातील महत्त्वाची निर्णयक्षम यंत्रणा आहे. प्रतिष्ठानचा वार्षिक कृती आराखडा आणि अर्थसंकल्पाला मंजुरी देणे, विविध विकासकामांना मान्यता देणे, उपलब्ध निधीचा नियमानुसार आणि पारदर्शक वापर होत असल्याची खात्री करणे, मंजूर कामांच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेणे तसेच प्रतिष्ठानचे वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षित खात्यांना मंजुरी देणे, अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या या परिषदेकडे असतात.
आमदार शंकर जगताप यांच्या नियुक्तीमुळे खनिजबाधित भागांतील नागरिकांच्या समस्या आणि विकासाच्या गरजा नियामक परिषदेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यास मदत होणार आहे. उपलब्ध निधीतून लोकहिताची आणि दीर्घकालीन परिणाम साधणारी विकासकामे मार्गी लावण्याच्या दृष्टीनेही त्यांच्या सहभागाला महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हा खनिज अधिकारी तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे सदस्य सचिव आनंद पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने आमदार जगताप यांचे नियुक्तिपत्र जारी केले आहे.
निधीचा पारदर्शक वापर आणि लोकहिताला प्राधान्य – आमदार जगताप
नियुक्तीनंतर आमदार शंकर जगताप यांनी या जबाबदारीच्या माध्यमातून खनिजबाधित भागांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. “जिल्हा खनिज प्रतिष्ठान पुणेच्या नियामक परिषदेवर पदसिद्ध सदस्य म्हणून मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. खनिजबाधित भागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी उपलब्ध निधीचा योग्य व पारदर्शक वापर व्हावा, यासाठी प्राधान्याने प्रयत्न करेन, अशी भूमिका आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केली.




