MPSC पेपरफुटीविरोधातील विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चाला रोहित पवारांचा पाठिंबा; ‘शुद्धीकरणाशिवाय लढा थांबणार नाही’
‘विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न, यात कुठलेही राजकारण नाही’; आयोगाच्या अध्यक्षांसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमध्ये कथित घोटाळ्यांच्या घटना समोर येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. परीक्षांमध्ये पारदर्शकता आणावी, घोटाळे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न गांभीर्याने सोडवावा, या मागण्यांसाठी पुण्यात आज, ७ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला आहे. ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
या मोर्चाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेसह विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे देखील मोर्चात सहभागी झाले. यावेळी रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर प्रश्न उपस्थित केले.
‘विद्यार्थ्यांच्या मागण्यांमध्ये कुठले राजकारण?’
रोहित पवार म्हणाले, ‘विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवणाऱ्या MPSC परीक्षांमध्येच भ्रष्टाचार होत असेल, तर प्रश्न विचारायचे नाहीत का? यात कुठलं राजकारण आलं? विद्यार्थ्यांच्या मागण्या राजकीय मागण्या आहेत का?’
MPSCच्या शुद्धीकरणाशिवाय हा लढा थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आजचा हा आक्रोश मोर्चा आहे. या मोर्च्यात कुठलेही राजकारण नाही, समाजकारण आहे. हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. सरकारला विनंती आहे की, यात कुठलेही राजकारण नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा,’ असे पवार म्हणाले.
आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाईची मागणी
आयोगाच्या अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असल्याचा दावा करत रोहित पवार यांनी अध्यक्ष आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांना पदावरून बाजूला करून आयोगाचे शुद्धीकरण करण्याची मागणी केली. तक्रारी दाखल होत असतील, तर त्यांची चौकशी करून कारवाई का होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा – आरक्षण आंदोलनातील बलिदान देणाऱ्या आंदोलकांच्या वारसांना MIDC मध्ये नोकरी; सरकारचा मोठा निर्णय
‘विद्यार्थी शांत बसणार नाहीत’
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित परीक्षेत भ्रष्टाचार होत असेल, तर विद्यार्थी शांत बसणार नाहीत, असा इशारा रोहित पवार यांनी दिला. सरकारला या आंदोलनातून नक्कीच धडा शिकवला जाईल, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, MPSCच्या उत्पादन शुल्क (विभागीय) परीक्षेतील मार्किंग पॅटर्न लीक प्रकरणात आयोगातील सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याचा सहभाग असल्याची माहिती समोर आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. ‘हे शॉकिंग आहे. इकडे विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात आणि तिकडे आयोगाने पेपर विकायचे, हे बिलकूल खपवून घेतले जाणार नाही,’ अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त केली.
MPSCचे शुद्धीकरण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला असून, सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





