TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी सरकारचे चार मोठे निर्णय; कुणबी नोंदी गावपातळीवर लावण्याच्या सूचना

मराठा विद्यार्थ्यांना OBCप्रमाणे शैक्षणिक सवलती; वसतिगृह भत्त्यासाठी ₹200 कोटी, 1,440 तरुणांना मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू असून, आज उपोषणाचा दहावा दिवस आहे. प्रकृती खालावत असल्याने मराठा आंदोलकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पातळीवर हालचालींना वेग आला असून, मराठा, कुणबी आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देणारे चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्य सरकारने यासंदर्भात चार स्वतंत्र शासकीय आदेश (GR/पत्रे) जारी केले आहेत. यामध्ये शैक्षणिक सवलती, वसतिगृह निर्वाह भत्ता, परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षणाचा समावेश आहे.

  1. मराठा विद्यार्थ्यांना OBCप्रमाणे शैक्षणिक सवलती

तंत्रशिक्षण संचालनालयाने सर्व विभागीय कार्यालये आणि विद्यापीठांना निर्देश दिले आहेत. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना OBC प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधांचा लाभ तातडीने लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  1. वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी 200 कोटी

EBC, EWS आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी ₹200 कोटींचा निधी मंजूर करून वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे हा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

हेही वाचा –  MPSC पेपरफुटीविरोधातील विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चाला रोहित पवारांचा पाठिंबा; ‘शुद्धीकरणाशिवाय लढा थांबणार नाही

  1. सारथीच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती धोरणात बदल

सारथी संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या धोरणात सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार परदेशी विद्यापीठांची शिक्षण फी थेट संस्थेला अदा केली जाणार असून, लाभाच्या रकमेवरील कमाल मर्यादा काढण्यात आली आहे.

याशिवाय विद्यार्थ्यांना दरवर्षी 1,500 अमेरिकन डॉलर अतिरिक्त निर्वाह/आकस्मिक भत्ता देण्यात येणार आहे. यूकेमधील शिक्षणासाठी हा भत्ता 1,100 GBP असेल. तसेच QS Rankingवर आधारित नवीन गुणवत्ता यादी कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे.

  1. 1,440 तरुणांना मोफत ड्रायव्हिंग आणि कंडक्टर प्रशिक्षण

सारथी संस्थेने IDTRS पिंपरी-चिंचवडसोबत सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार 1,440 मराठा आणि कुणबी तरुणांना LMV, HMV ड्रायव्हिंग आणि कंडक्टरचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

हे प्रशिक्षण 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार असून, प्रशिक्षण घेणाऱ्या किमान 1,000 लाभार्थ्यांना रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कुणबी नोंदी गावपातळीवर लावण्याच्या सूचना

दरम्यान, कुणबी नोंदी आणि हैदराबाद गॅझेटिअरनुसार उपलब्ध झालेल्या नोंदी गावपातळीवर प्रसिद्ध करण्याबाबतही प्रक्रिया सुरू आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील अधिकारी आणि विभागीय आयुक्तांसोबत आढावा बैठक घेत आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुणबी नोंदी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आल्या असून, त्या मोबाईलवरही पाहता येणार आहेत. ज्या गावांच्या नोंदी उपलब्ध झाल्या आहेत, त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत नोंदी लावण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गावपातळीवर सर्व उपलब्ध नोंदी लावण्याच्या सूचना राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच जिल्ह्याच्या वेबसाईटवर नोंदी उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button