अभिमानास्पद! धायरी ग्रामस्थांचा हुंडाबंदी आणि लग्नातील अनिष्ट प्रथा निर्मूलनासाठी एल्गार; ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव मंजूर

पुणे | वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळीच्या पार्श्वभूमीवर हुंडाबंदीसह लग्नातील अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील धायरी ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. धायरी येथे ग्रामस्थांनी ग्रामसभा आयोजित केली होती. यावेळी मराठा, बहुजनांसह अठरापगड जातीच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत भाग घेतला. सर्वांनी एकमताने हुंडा न देणे आणि हुंडा न घेण्याचा ठरावही मंजूर केला. या वेळी लग्नातील अनेक चुकीच्या प्रथा बदलण्याचे ठरावही मंजूर करण्यात आले.
हुंड्यावरून छळ होऊ द्यायचा नाही आणि सहनही करायचा नाही, हुंड्यावरून छळ होत असल्यास मुलीला सासरी पाठवायचे नाही, कमी खर्चात आणि कमी लोकांमध्ये लग्न पार पाडावीत, लग्न वेळेतच लावावीत, एकाच दिवशी साखरपुडा, लग्न आणि अन्य विधी करावेत. नेत्यांच्या मानपानात वेळ वाया घालवू नये, सत्कार करु नयेत, साखरपुड्याला कमी महिला आणि कमी पुरुषांनी औक्षण करावे, लग्नात नाहक खर्च करू नये, जेवणामध्ये मोजकेच पदार्थ करावेत. जास्त पदार्थ टाळावेत, पारण्याच्या मिरवणुका आणि त्यामुळे होणारी गर्दी टाळावी.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींनी देशाची दिशाभूल केलीय का? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल!
प्री व्हिडिओ शूटिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये जाणार वेळ वाचवावा, असा निर्णय या ग्रामसभेत घेण्यात आला. फोटोग्राफर आणि मेकअप आर्टिस्ट यांना समज देण्यात यावी. लग्न ठरण्यापूर्वी एक वेळ पत्रिका नाहीं पाहिली तरी चालेल पण मुलांचे शारीरिक आरोग्य तपासणी करूनच लग्ने ठरवावीत. लग्नात काय दिले, काय नाही याची चर्चा करू नये. सोने, चांदी, आहेर यांचा उल्लेख टाळावेत. आदर्श विवाह घडवून आणणाऱ्या कुटुंबाचा सन्मान करण्यात यावा. ठरावांचे फलक गावात लावण्यात यावेत. चुकीच्या प्रथा बंद करून मुलगा आणि मुलगी कसे सुखी राहतील याचा विचार करावा, असा ठरावच या ग्रामसभेत करण्यात आला.