श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे उद्या तब्बल २ हजार किलो द्राक्षांची आरास
पुणे | पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे उद्या सोमवारी २१ मार्च रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त या गणपती मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम २ हजार किलो द्राक्षांची आरास यावेळी केली जाणार आहे.
आरासासाठी वापरलेली ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम तसेच वृद्धाश्रमात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. द्राक्षाच्या हंगामात प्रथमच अशा पद्धतीची आरास मंदिरात केली जाणार आहे. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभामंडपात ही आकर्षक आरास केली जाईल. उद्या सोमवारी सकाळी ९ वाजता ही आरास पूर्ण होणार असून त्यानंतर भाविकांना पाहण्यासाठी खुली होणार आहे. सह्याद्रीच्या शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वीच हा उपक्रम करण्यासाठी द्राक्षे देऊ केली होती, मात्र कोरोनामुळे आलेल्या निर्बंधांमुळे ते शक्य झाले नव्हते. आता मात्र निर्बंध हटवल्याने हा योग जुळून आला आहे.





