प्रगती महाविद्यालयात ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लबची स्थापना
शिक्षण विश्व: विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती; १६ सायबर दूतांची निवड

पुणे | सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी डोंबिवली येथील प्रगती कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ क्लबची स्थापना करण्यात आली आहे.
सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करणे, सुरक्षित डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे आणि ऑनलाइन फसवणुकीपासून नागरिकांना संरक्षण मिळवून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी प्रा. रुपाली पाटील यांचे विशेष प्रोत्साहन लाभले असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय वानखडे यांनी आवश्यक सहकार्य केले.
महाविद्यालयाच्या आयटी विभागातील उत्साही, जबाबदार आणि नेतृत्वगुण असलेल्या विद्यार्थ्यांची क्लब ऑफिसर्स म्हणून निवड करण्यात आली आहे. याशिवाय १६ विद्यार्थ्यांची ‘सायबर दूत’ म्हणून निवड करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून समाजात सायबर सुरक्षेविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. हे विद्यार्थी नागरिकांना सुजरक्षित डिजिटल व्यवहार, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण आणि डिजिटल सुरक्षिततेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
हेही वाचा
कचरा प्रश्न पेटला : मोशी परिसरातील नगरसेवकांचा ‘‘एल्गार’’
दरम्यान, क्लब ऑफिसर्सचा पदग्रहण सोहळा नुकताच क्विक हील फाउंडेशनच्या पुणे येथील कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, असोसिएट डायरेक्टर अजय शिर्के, सीएसआर एक्झिक्युटिव्ह गायत्री पवार-केसकर आणि दिपू सिंग यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व, डिजिटल सुरक्षितता, सायबर गुन्ह्यांपासून बचाव आणि जनजागृती उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या क्लबच्या अध्यक्षपदी आदर्श उपाध्याय, सचिवपदी आरती पवार, उपक्रम प्रमुखपदी संस्कृती कोरगांवकर आणि मीडिया प्रमुखपदी ईश्वरी किजबिले यांची निवड करण्यात आली आहे. तसेच, प्रा. रुपाली पाटील या शिक्षक समन्वयक म्हणून कार्यरत राहणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सायबर जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथजी पाटील यांनी सर्व सायबर वॉरियर्सचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, प्राचार्य डॉ. धनंजय वानखडे, उपप्राचार्या डॉ. कीर्ती बारड, प्रा. रुपाली पाटील आणि शिक्षकवृंद यांनीही सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
सायबर सुरक्षेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नेतृत्वाची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम समाजात डिजिटल सुरक्षिततेबाबत सकारात्मक बदल घडवून आणण्यास महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षा ही केवळ तांत्रिक गरज नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी बनली आहे. विद्यार्थ्यांनी सायबर वॉरियर्स म्हणून पुढे येत समाजात जनजागृती करण्याचा घेतलेला संकल्प निश्चितच कौतुकास्पद आहे. प्रगती महाविद्यालय आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेला ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासोबतच समाजाला सुरक्षित डिजिटल भविष्य देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.
– जगन्नाथ पाटील, अध्यक्ष.





