कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश

पुणे : नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार मंगळवारी स्वत: रस्त्यावर उतरले. वाघोली परिसरातील कोंडी, सिग्नल व्यवस्था, कोंडीची ठिकाणांची पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त अधिकाऱ्यांबरोबर दीड किलोमीटर चालत गेले.
वाघोली पुण्याचे प्रवेशद्वार आहे. या भागातून जाणााऱ्या नागरिकांना कोंडीचा त्रास सहन करावा लागत असल्याने पोलीस आयुक्तांनी खराडी जकात नाका ते पेरणे फाट्यापर्यंतच्या अतिक्रमणांवर कारवाई (सर्जिकल स्ट्राईक) करा, आदेश त्यांनी दिले. या भागातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन काम करावे, तसेच १० फेब्रुवारीपर्यंत या भागातील वाहतूक समस्या सोडवावी, अशी सूचना त्यांनी दिल्या.
नगर रस्त्यावरून पुण्याकडे येणारे वाहनचालक वाघोलीमार्गे शहरात येतात. वाघोली ते खराडी हे अंतर दहा मिनिटांत कापता येते. मात्र, वाहनांची संख्या, अवजड वाहने, अतिक्रमणांमुळे दहा मिनिटांचे अंतर कापण्यासाठी किमान अर्धा ते पाऊण तास वेळ लागतो. याबाबत वाहनचालक, रहिवाशांनी तक्रारी केल्या होत्या. शिरूर मतदार संघातील आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळी आयुक्त नगर रस्त्यावर आले. खराडी जकात नाका ते पेरणे फाटादरम्यान पाहणी केली. आमदार कटके, तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमाेल झेंडे यांच्यासह अधिकारी या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा : चऱ्होलीमधील मुलांची नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये नेत्रदीपक कामगिरी!
नागरिकांच्या सूचनांची दखल घेऊन नगर रस्ता कोंडीमुक्त करुन वाहतूक गतिमान करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे आमदार कटके यांनी सांगितले. वाघोली भागातील रहिवासी रामदास दाभाडे, नवीन नायडू, अनिल सातव, समीर भाडळे, संपत गाडे, चंद्रकांत वारघडे या वेळी उपस्थित होते.
नागरिकांच्या सूचना
-नगर रस्त्यावरील खड्डे बुजवावेत.
-काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी असलेले विजेचे खांब काढून टाकावेत
-सहा आसनी रिक्षा, प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बस, माल वाहतूक करणारी अवजड वाहनांचे थांबे निश्चित करावेत
वाघोली भागातील पानपट्ट्यांवर अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी केला. पानपट्ट्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पानपट्टीच्या नावावर अमली पदार्थांची विक्री होत असेल, तर कडक करवाई करावी, असे आदेश दिले.
नगर रस्त्यावर भरधाव डंपरमुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. डंपर चालक आणि मालकांनी याबाबत उपाययोजना कराव्यात. डंपरचालक प्रशिक्षित असायला हवा. चालकाला मद्यपानाची व्यसन आहे का नाही, याची खात्री डंपरमालकांनी करावी. अपघात झाल्यास चालकाचा वाहन परवाना रद्द करण्यात यावा. खडी वाहतूक करणारे डंपर कापडाने झाकायला हवेत. त्यामुळे धूळही उडणार नाही, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत.





