जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाची पहाट; शंकराचाऱ्यांच्या उपस्थितीत घटस्थापना
अध्यात्मिक सोहळा: गुरव–वीरकोळी घडशींकडून मोफत अन्नदान सेवा

पुरंदर : महाराष्ट्राच्या कुलदैवत खंडोबा-म्हाळसादेवींचा पारंपरिक चंपाषष्ठी उत्सव जेजुरी गडावर धार्मिक उत्साहात सुरू झाला असून, आज मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेनिमित्त मुख्य उत्सवाचा प्रारंभ झाला. करवीरपीठाचे शंकराचार्य परमपूज्य आध्य श्री नृसिंह भारती यांच्या उपस्थितीत मुख्य उत्सव मूर्तींची घटस्थापना पारंपरिक वेदघोष आणि सनई-चौघड्याच्या निनादात करण्यात आली.
मुख्य गाभाऱ्यातील स्वच्छता, पाखळणी आणि उरकणीची कामे पूर्ण झाल्यानंतर उत्सव मूर्ती बालद्वारीत नेण्यात आल्या. दुपारी बरोबर १२ वाजता शंकराचार्यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा, अभिषेक आणि घटस्थापना सोहळा संपन्न झाला. या वेळी श्रीमार्तंड देवसंस्थानचे ट्रस्ट अध्यक्ष मंगेश घोणे, माजी विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, विश्वास पानसे, संदिप घोणे तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारभाई आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा – SC-ST समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अत्याचाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना सरकारी नोकरी

पूजारी सेवेकरी वर्ग, वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी, मंगेश खाडे गुरुजी यांच्या मंत्रोच्चारात पारंपरिक रीतीने पूजा पार पडली. या वेळी मार्गदर्शन करताना शंकराचार्य म्हणाले, “देवाकडे सतत काहीतरी मागत बसण्यापेक्षा गरजूंच्या सेवेसाठी पुढे सरसावणे हीच खरी उपासना. देवालयात राजकारणास स्थान नसावे.”
उत्सवादरम्यान दरवर्षीप्रमाणे सहा दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून येथील मंदिर उपासक गुरव वीर कोळी घडशी, कर्मचारी व सेवेकरी वर्ग विविध दानशूर भक्तांच्या सहकार्याने मोफत अन्नदान सेवा अखंडपणे चालवत आहेत. उत्सवकाळात सात दिवस हजारो भाविकांना याचा लाभ मिळत असून, सेवाभावी कार्याची प्रशंसा सर्वत्र होत आहे. चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्ताने जेजुरी गडावर भक्तांची मोठी गर्दी उसळली असून, धार्मिक उत्साहात ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जयघोष घुमत आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“देवाकडे हात पसरून मागण्यात नाही, तर त्याच्या लेकरांसाठी—गरीब, दुबळ्या आणि गरजूंसाठी हात पसरवून सेवा करण्यात खरी भक्ती आहे. देवालय हे मतभेदाचे नव्हे, तर प्रेम, शांतता आणि नि:स्वार्थ सेवाभावाचे केंद्र असावे.”
— परमपूज्य नृसिंह भारती, शंकराचार्य करवीर पीठ.




