व्यापाऱ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी चार पोलिस अंमलदारांना निलंबित
व्यापाऱ्यांशी उर्मट शब्दांत गैरवर्तन
पुणे : ‘आम्ही पोलिस आहोत; आमचे कोणी काहीही करू शकत नाही’ अशा उर्मट शब्दांत व्यापाऱ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हे शाखेतील चार पोलिस अंमलदारांना निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे चौघेही विश्रांतवाडी परिसरात ‘कॉप्स २४ बीट मार्शल’ म्हणून कार्यरत होते. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी ही कारवाई केली.
योगेश सुरेश माळी, मुकेश श्रीधर वाळले, शंकर दत्ता धोत्रे, कैलास शेषराव फुपाटे अशी निलंबित केलेल्या पोलिस अंमलदारांची नावे आहेत. हे सर्व ‘कॉप्स २४ बीट मार्शल’ गुन्हे शाखे अंतर्गत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. ११ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता आळंदी रस्ता चौकी परिसरातील काही व्यापाऱ्यांनी पोलिस चौकीत या अंमलदारांच्या वर्तणुकीबाबत तक्रार केली.
‘आम्ही पोलिस आहोत; आमचे कोणी काहीही करू शकत नाही. आमच्याकडे पैसे मागितल्यास तुम्हाला हद्दीत व्यवसाय करू देणार नाही,’ अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रार स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी केला.
हेही वाचा : ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाची 15 एकर शासकीय जमीन बिनबोभाट लाटली!
दुसऱ्या दिवशी वरिष्ठांनी सकाळी चौकशीदरम्यान चारही जणांनी विचारणा केली. परंतु त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी चार पोलिस अंमलदारांवर गुरुवारी (ता. १३) निलंबनाची कारवाई केली. निलंबनाच्या कालावधीत त्यांना दररोज पोलिस मुख्यालयात हजेरी देणे अनिवार्य असेल, असे आदेशात नमूद केले आहे.
‘कॉप्स २४ बीट मार्शल’ –
पुणे शहर पोलिस दलात ‘कॉप्स २४ बीट मार्शल’ हे गुन्हे प्रतिबंध, गस्त आणि तत्काळ प्रतिसाद यासाठी नियुक्त करण्यात आलेली विशेष गस्त पथके आहेत. गुन्हे शाखेच्या नियंत्रणाखाली ही पथके शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत २४ तास गस्तीवर असतात.





