ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाची 15 एकर शासकीय जमीन बिनबोभाट लाटली!
आणखी एक जमीन घोटाळा उघड; सहाय्यक दुय्यम निबंधकांचे निलंबन

सरकारला अंधारात ठेवून जमिनीची परस्पर विक्री
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड परिसरातील ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाची 15 एकर शासकीय जमीन बेकायदेशीरपणे विक्री झाल्याचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणात पशुसंवर्धन विभागाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, या घोटाळ्यात 22 वारस तसेच खरेदीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान यामध्ये सहाय्यक दुय्यम निबंधकांचे निलंबन करण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे निलंबनाचे आदेश दिले आहेत.
पुण्यातील मुंढवा येथील मूळची महार वतनाची आणि सध्या सरकारच्या ताब्यात असलेली ४० एकर जागा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता तसंच मुद्रांक शुल्क बुडवून परस्पर विकल्याचं प्रकरण ताजे असतानाच पुणे जिल्ह्यातील आणखी एका सरकारी जमिनीचा घोटाळा समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. ही जमीनही सरकारला अंधारात ठेवून त्यांची परस्पर विक्री झाल्याचा प्रकार घडला आहे. ताथवडे इथली १५ एकर जमिनीची बेकायदा विक्री झाल्याची तक्रार पशुसंवर्धन खात्यानं पुणे विभागीय आयुक्तांकडं केली आहे.
या विक्री प्रकरणात निबंधक कार्यालयातील गंभीर अनियमितता उघड झाल्याने सहाय्यक दुय्यम निबंधक विद्या बडे या महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. हवेली क्रमांक 17 येथील निबंधक कार्यालयात दस्त क्र. 685/2025 या खरेदीखताच्या नोंदणीदरम्यान अनेक त्रुटी आढळल्या. दस्त नोंदणी करताना अद्ययावत सातबारा न जोडता जुना सातबारा उतारा स्वीकारण्यात आला. यामुळे जमीन पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यात असल्याची आणि विक्रीवर बंदी असल्याची नोंद दुर्लक्षित झाली.याशिवाय संबंधित कर्मचाऱ्याने भोगवटादार हेरंब गुपचूप आणि वारसांची नोंद आणि इतर अधिकारात असलेल्या नोंदी ‘स्किप’ करून दस्त नोंदणी पूर्ण केली. या निष्काळजीपणामुळे कोट्यवधींच्या शासकीय जमिनीची बेकायदेशीर विक्री नोंदवली गेली……..
हेही वाचा – लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करावी

अकरा महिन्यांपूर्वी जमिनीची विक्री
पिंपरी-चिंचवड भागातील ताथवडे येथील राज्य सरकारच्या पशुसंवर्धन खात्याच्या मालकीची १५ एकर जमीन खात्याला अंधारातून ठेवून परस्पर विकली गेली आहे. या व्यवहाराची कागदपत्रे देखील तयार करण्यात आली आहेत. अकरा महिन्यांपूर्वी हा बेकायदा जमीन विक्रीचा प्रकार घडला आहे. विक्री व्यवहाराचा दस्त झाल्याची माहिती पशुसंवर्धन खात्याला मिळाल्यानंतर खात्यानं विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. तक्रार आल्यानंतर विभागीय आयुक्तांनी नोंदणी व मुद्रांक विभागाला याबद्दल विचारणा केली, त्यानंतर खरोखरच हा बेकायदा विक्रीचा धक्कादायक व्यवहार समोर आला.
बिनबोभाट व्यवहार
ताथवडे येथे पशुसंवर्धन खात्याची ७२ हेक्टर (सुमारे १७८ एकर) जागा आहे. त्यातील एका गटातील पंधरा एकर जागेवर पशुसंवर्धन खात्याचे नाव इतर अधिकारात आहे. त्यामुळं खात्याच्या परवानगीशिवाय जमिनीचा व्यवहार करता येत नाही. तरीही जानेवारीमध्ये या व्यवहाराला सुरुवात झाल्याचे समोर आलं आहे. संबंधित जागा हेरंब गुपचूप यांच्या खासगी मालकीची असली, तरी इतर अधिकारात पशुसंवर्धन खात्याची नोंद आहे. या जागेसंदर्भात हायकोर्टात मालकाने दावा दाखल केला होता. त्या दाव्याच्या निकालात कोर्टानं मालकीसंदर्भात कोणतेही भाष्य केलेलं नाही. त्यामुळं सातबारा उताऱ्यावर इतर अधिकारात पशुसंवर्धन खात्याचं नाव कायम राहिलं. तरीही जानेवारी २०२५ मध्ये गुपचूप यांनी या जागेचा विक्रीचा व्यवहार केला. या व्यवहारापोटी सरकारला कुठलीही माहिती न देता कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला.
सहाय्यक दुय्यम बडे निलंबित!
पुण्यात मुंढव्यातील ४० एकर आणि बोपोडीतील १३ एकर सरकारी जमिनींचा व्यवहार गाजत असतानाच ताथवडेतील हा तिसरा १५ एकर सरकारी जमीन विक्रीचा बेकायदा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकरणी सहाय्यक दुय्यम निबंधक विद्या बडे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे निलंबनाचे आदेश दिले आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. निलंबनाच्या काळात त्यांना मुख्यालय मुंबई येथे राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या काळात कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करण्यास मनाई असून, नियमांचे उल्लंघन केल्यास पुढील कारवाई केली जाणार आहे असे आदेशात म्हटले आहे.




