‘ही निवडणूक बारामतीकरांच्या भवितव्याची’; उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे अॅक्शन मोडवर आले आहे. गेल्या महिन्याभरापासून अजित पवार हे जनसन्मान यात्रेत व्यस्त आहेत. त्यातच आता अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. “दुसरा आमदार मिळाला तर दोघांच्या कामाची तुलना करा. यंदाची निवडणूक बारामतीकरांच्या भवितव्याची”, असे अजित पवारांनी म्हटले.
अजित पवारांची जनसन्मान यात्रा सध्या बारामतीत आहे. यानिमित्ताने अजित पवारांनी दणदणीत भाषण केले. या भाषणावेळी अजित पवारांनी यंदाच्या निवडणुकांबद्दल एक मोठं वक्तव्य केले. तसेच त्यांनी विरोधकांवरही जोरदार निशाणा घेतला. “पद असेल तर काम करेल, नाही तर नाही करणार अशी भूमिका घेऊ नका. काही चूकत असेल तर मला सांगा. गावातील वरिष्ठ आणि वडिलधाऱ्या मंडळींना भेटलं पाहिजे. त्यांचा आदर ठेवा”, असा सल्लाही अजित पवारांनी केला.
हेही वाचा – FACT CHECK : पिंपरी-चिंचवडकरांच्या जिव्हाळ्याचा भामा आसखेड पाणी प्रकल्प लांबणीवर का पडला?
“महाराष्ट्रात पाच वर्षात एवढी कामे झाली नसेल तेवढी बारामतीत झाली. एक वर्ष कोरोनात गेलं आणि एक वर्ष सत्तेत नव्हतो. नाही तर आणखी कामे झाली असती. इतकी विकासाची कामे करूनही बारामतीत हरलो. कामं करूनही पराभव झाला. दुसरा आमदार मिळाला तर दोघांच्या कामाची तुलना करा. इतर कुणी आमदार मिळाला पाहिजे का? आम्ही फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. अर्थसंकल्पात मी लिहिलं आहे. बारामतीत माझ्याशिवाय नेतृत्व पाहिजे का?” असा सवाल अजित पवारांना विचारला.
“रोखठोक बोलणारा म्हणून माझी ओळख आहे. बारामती शहर असो गावं असतील आपण विकास करत आहोत. विकास कामांना प्राधान्य कसं देता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. विकास करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. काही महत्त्वाचे निर्णय घेताना आपण लोकांचं मत घेतो. शेवटी निर्णय मीच घेतो. पण मतं जाणून घेतलं तर निर्णय घेताना फायदा होता. आजही मी मनिवृत्त अधिकाऱ्यांशी बोलून त्यांचंही मत जाणून घेत असतो”, असेही अजित पवारांनी म्हटले.
“तुम्ही लाईटली घेऊ नका. आपण केलेला विकास मतदारांना सांगा. घड्याळाने ही कामे केली सांगा. आपण आपल्या टर्मपुरती कामं केलेली त्यांच्या मनावर बिंबवली पाहिजे. ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून आणि बारामतीकरांच्या भवितव्याची निवडणूक आहे. पाच वर्षात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे परिणाम होणार आहे त्याची निवडणूक आहे. आपण सत्तेत असू तर काही करता येणार आहे”, असेही अजित पवार म्हणाले.





