येरवडा ते शिरुर सहा पदरी उड्डाणपूलास मान्यता
पुणे : नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येरवडा ते शिरुर हा 53 कि.मी. दरम्यान सहा पदरी उड्डाणपूल उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे.उड्डाणपूल उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत केले जाणार आहे. त्यास 7 हजार 515 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सध्याच्या पुणे-शिरुर-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.नगर रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी येरवडा ते शिरुर हा रस्ता सहापदरी करण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करावा’ असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मध्यंतरी दिले होते.
हेही वाचा – राज्यात सामाजिक अराजकता पसरवणाऱ्या नितेश राणेंना देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक करा; इम्रान शेख
नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. त्यामधील महापालिकेच्या हद्दीतील येरवडा ते खराडी पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो.नगर रस्ता हा राज्य मार्ग असल्याने राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या सिग्नल फ्री जुन्या पुणे-मुंबई रस्त्याच्या धर्तीवर हा रस्ता विकसित करण्यात यावा आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत होती.
येरवडा ते शिक्रापूर हा रस्ता सहापदरी करण्याबरोबर कोणत्या ठिकाणी उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर करायचे, यासंबंधीचा आराखडा करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार यासाठीचा सविस्तर प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला होता. त्यास गुरुवारी मंत्रिमंडळाने मान्यता दिली.