भीमाशंकर विकास आराखडा तयार करावा; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सूचना

पुणे : नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामधील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. भीमाशंकर तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असून, येथे भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात, भीमाशंकर तीर्थक्षेत्र सर्वात चांगले तीर्थक्षेत्र तयार झाले पाहिजे त्यादृष्टीने या तीर्थक्षेत्राच्या परिसराचा समग्र विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या आहेत.
तीर्थक्षेत्र विकासांतर्गत श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकासकामांच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी या सूचना दिल्या. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा – नगर रस्त्यावरील अर्धवट बीआरटी काढण्यास सुरुवात; उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिकेची कारवाई
भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच या परिसरातील विविध देवस्थान, धार्मिक स्थळांची विकास कामे रस्त्याची कामे, येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी, पर्यटनाच्या दृष्टीने देण्यात येणाऱ्या सुविधा पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, इको टुरिझम आदी बाबींचा समावेश या विकास आराखड्यात करुन पुढील दहा दिवसात आराखडा प्रशासनाकडे सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
या विशेष विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या अगोदर येत्या दोन वर्षात ही कामे पूर्ण झाली पाहिजे. त्यादृष्टीने सर्व संबंधितांनी नियोजन करावे, असे डुडी म्हणाले.