Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

धावपट्टीच्या विस्तारासाठी हवाई दलाला पर्यायी जागा; प्रस्तावावर एकमत, लवकरच पूर्ततेसाठी हालचाल

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या विस्तारापूर्वी राज्य सरकारला हवाई दलाला पर्यायी जागा द्यावी लागणार आहे. हवाई दल आणि विमानतळ प्राधिकरण यांच्यात या प्रस्तावावर एकमत झाले. त्यानुसार विमानतळ प्राधिकरणाकडून संबंधित प्रस्ताव तयार करून राज्य सरकार आणि हवाई दलाच्या मुख्यालयाला पाठविण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

हवाई वाहतुकीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय शहरे पुण्याशी जोडली जावी, मोठ्या आकाराच्या विमानांची वाहतूक व्हावी या उद्देशाने पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्ताराला केंद्रीय पातळीवरील यंत्रणांकडून परवानगी मिळाली आहे. मात्र, आवश्यक भूसंपादन आणि विस्ताराबाबत संरक्षण विभाग, हवाई विभाग या विभागांच्या तरतुदींबाबत प्रक्रिया पार पाडण्यासंदर्भात, तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.

विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, विमानतळाचे संचालक संतोष ढोके, हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

पुणे विमानतळ हवाई दलाचे आहे. त्यामुळे धावपट्टीच्या विस्तारासाठी प्रामुख्याने संबंधित विभागाची जागा विमानतळ प्राधिकरणाला ताब्यात घ्यावी लागणार आहे. ही जागा ताब्यात आल्यानंतर प्राधिकरणाला अपेक्षित ठिकाणी व्यवस्थापनाबाबत तरतुदी करणे शक्य होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हवाई दलाकडून जागेच्या मोबदल्यात पर्यायी जागा असा प्रस्ताव मोहोळ यांच्या बैठकीत मान्य झाला. त्यामुळे धावपट्टी विस्तारासाठी किती जागा अपेक्षित आहे, हवाई दलाची जागा, खासगी जागा किती संपादित करावी लागणार आहे, त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच, हवाई दलाला मोबदल्यात पर्यायी जागा देण्याबाबत मुख्यालयाच्या संमतीसाठी मागणी प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.

हेही वाचा –  त्रिवेणीनगरमधील चौकांमध्ये दोन्ही बाजूंना ‘हाईट बॅरीगेट्स’

संबंधित प्रस्ताव पाठविल्यानंतर सहमती प्राप्त होताच पर्यायी जागेबाबत राज्य सरकारकडून मान्यता घेतली जाईल. त्यानंतर विमानतळाच्या धावपट्टीसाठी भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी पुणे विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणासाठी आवश्यक असणारा ‘ऑब्स्टिकल लिमिटेशन सरफेस’ (ओएलएस) सर्व्हेचा अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे विस्तारीकरण झाल्यावर कुठलेच अडथळे येणार नसून उड्डाण करताना सुरक्षिततेबाबतचे मापदंडही सुस्थितीत आहेत. त्यामुळे हवाई दलाच्या जागेबाबत सर्वेक्षण करून राज्य सरकाकडे जागेची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

सध्या पुणे विमानतळाच्या धावपट्टीची लांबी – २५३५ मीटर (८,३१६ फूट)

धावपट्टीची रुंदी – ४५ मीटर

धावपट्टीच्या विस्तारासाठी अपेक्षित जागा (अंदाजे पूर्वेकडून – सुमारे ६५० मीटर, पश्चिमेकडून – सुमारे ३५० मीटर

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

पुणे विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण गरजेचे आहे. ही प्रक्रिया वेगाने होण्यासाठी संबंधित विभागांना युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत. विस्तारासाठी राज्य सरकारकडून भूसंपादन प्रक्रिया वेगाने करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाला हवाई दलाची जागा ताब्यात घेण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री

मंत्र्यांच्या आदेशानुसार विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी तातडीने मागणी प्रस्ताव तयार करून हवाई दलाच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. मोबदल्यात हवाई दलाला कुठली, किती जागा द्यायची याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल. त्यानुसार लवकरच प्रस्ताव करून पाठविण्यात येईल.

संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ प्राधिकरण

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button