लोणावळ्यात दोन ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई
लोणावळा | रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई करून त्यांच्या चालकांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी ही धडक कारवाई केली असून मागील तीन महिन्यांत फोफावलेल्या अवैध धंदे चालक मालकांचे पुन्हा धाबे दणाणले आहेत.
लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक हे तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर शुक्रवारी सायंकाळी पुन्हा रुजू झाले. रुजू होतास आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या पथकासह शुक्रवारी मध्यरात्री मावळातील कामशेत येथील दीपा बार अँड रेस्टॉरंट, व वडगाव मावळ मधील फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट अशा दोन ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.
यामध्ये दोन्ही बार रेस्टॉरंटच्या चालकांनी विहित वेळेच्या नियमांचे उल्लंघन करून बार सुरू ठेवत बारमध्ये ग्राहकांना खाद्यपदार्थ, दारूची विक्री करताना तसेच वाद्य, ऑर्केस्ट्रा चालू ठेवल्याचे निदर्शनास आले. यामुळे दोन्ही बार चालकांच्या विरोधात कामशेत व वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.