‘देवेंद्र फडणवीस लाचार, हतबल मुख्यमंत्री’; संजय राऊतांची खोचक टीका
दिल्लीने मुख्यमंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केला : संजय राऊत

मुंबई | महायुती सरकारने १८ जानेवारी रोजी पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली. मात्र अंतर्गत धुसफूस निर्माण झाल्यानंतर नाशिक आणि रायगड जिल्ह्याचा निर्णय रद्द करण्यात आला. यावरून आता महायुतीमधील अंतर्गत कुरघोडी उघड झाली असून विरोधक त्यावर टीका करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपदाचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यात बदल केला. एरवी कडक शिस्त, कठोर निर्णय घेणारे मुख्यमंत्री म्हणून प्रतिमा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना स्वतःचाच निर्णय का बदलावा लागला? पालकमंत्रीपदासाठी इतका हौरटपणा का? पालकमंत्रीपदावरून जी दंगल सुरू आहे, ही त्या त्या जिल्ह्यातील आर्थिक उलाढालीवरून सुरू आहे. आर्थिक कारणांवरून ही मारामारी सुरू आहे, त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला निर्णय बदलून ते हतबल, लाचार मुख्यमंत्री असल्याचे दाखवून दिले आहे.
हेही वाचा : कोलकाता बलात्कार-हत्येप्रकरणी आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा
दिल्लीने मुख्यमंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केला आहे. हे सरकार दिल्लीतून चालेल, असे आम्ही आधीपासून सांगत आलो आहोत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे या कळसुत्री बाहुल्या आहेत आणि त्यांच्या हाता-पायांना बांधलेले दोरे दिल्लीतून नाचवले जातात, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. मुख्यमंत्री सरकारचा निर्णय घेऊन राज्यातील गुंडागर्दी, मनमानी मोडण्याचा प्रयत्न करत असताना दिल्ली रस्त्यावर येऊन पालकमंत्रीपदासाठी दंगल करणाऱ्यांच्या बाजूने उभी आहे. पालकमंत्रीपदासाठी दंगल महाराष्ट्राने याआधी पाहिली नव्हती, असं संजय राऊत म्हणाले.
अमित शाह आहेत म्हणून शिंदे सेनेचे अस्तित्व – संजय राऊत
माजी खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाचे आमदार शिंदेंच्या शिवसेनेत येणार असल्याचे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, राहुल शेवाळेंचा आम्ही दारूण पराभव केला. आता ते किती फोडाफोडी करणार? अमित शाह आहेत तोपर्यंत शिंदे गटाचे अस्तित्व आहे. त्यानंतर या लोकांना भविष्य नाही. अमित शाह आहेत, म्हणून निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय तुम्हाला हवा तसा निकाल देत आहे. बाकी तुमच्याकडे काय आहे? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.





