लोणावळ्यात दोन दिवसांत ४३० जड अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई
लोणावळा शहर वाहतूक पोलिसांची कारवाई
लोणावळा | लोणावळा-खंडाळा शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर जड व अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी असतानाही, बंदीच्या आदेशाला केराची टोपली दाखवत रोज मोठ्या संख्येने जड व अवजड वाहने ये जा करत आहेत. यामुळे लोणावळा व खंडाळ्यात वाहतूक कोंडी होत आहे. सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या जड व अवजड वाहनांवर लोणावळा शहर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली. दोन दिवसांत सुमारे ४३० जड व अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना ४ लाख, ८८ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.
लोणावळा व खंडाळा शहरांमधून जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मात्र मागील काही वर्षांपासून वाढलेल्या नागरिकरणासह वाहनांच्याही संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. वाढत्या नागरिकरणा व वाहनांच्या संख्येमुळे जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग तुटपुंजा पडू लागल्याने विशेषतः लोणावळा व खंडाळा भागात सातत्याने वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या दैनंदिनी वाहतूक कोंडीमुळे स्थानिकांसह पर्यटकांना मोठा सामना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीला व अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या जड व अवजड वाहनांना २०२२ पासून जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरून लोणावळा व खंडाळ्यातून ये जा करण्यास जिल्हाधिकारी पुणे यांनी बंदीचे आदेश काढून बंदी घातली होती.
हेही वाचा – ‘पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार’; अजित पवार गटाच्या मंत्र्याचं विधान चर्चेत
परंतु आदेशात सुस्पष्टता नसल्यामुळे कोणत्या वाहनांवर कशाप्रकारे कारवाई करायची याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी पुणे यांनी सुधारित आदेश पारित करत सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांच्या प्रवेशाला बंदीचे आदेश लागू केले. यामध्ये सकाळी सहा ते रात्री १० यावेळेमध्ये जड व अवजड वाहनांना लोणावळ्यातून ये जा करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे.
असे असले तरी, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वाचवण्यासाठी अनेक वाहनचालक या बंदी आदेशाचे उल्लंघन करत लोणावळा शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत आहेत. यामुळे अपघात तसेच वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. या घटना रोखण्यासाठी लोणावळा शहर पोलीस वाहतूक विभागाच्या वतीने दैनंदिन अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. तरीही वाहतूक कोंडीची समस्या कायमची असल्याने सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व अपघातांना आळा घालण्यासाठी लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार अनिल शिंदे व सचिन कडाळे यांच्या पथकाने या महामार्गाने लोणावळा व खंडाळ्यातून जाणाऱ्या जड व अवजड वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत ४३० जड व अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्यावर ४ लाख, ८८ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.