‘त्या’ आदेशावर दोन महिन्यांत कार्यवाही; महापालिका आयुक्तांचा ३२ गावांना दिलासा

पुणे : महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील मिळकतींना ग्रामपंचायत मिळकतकराच्या दुप्पट दराने कर आकारणी करण्याबाबत राज्य शासनाने दिलेल्या आदेशावर पुढील दोन महिन्यांत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी दिले. आमदार विजय शिवतारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ३२ गावांच्या कृती समिती सदस्यांची बैठक झाली. यामध्ये आयुक्तांकडून ही माहिती देण्यात आल्याचे कृती समिती सदस्यांनी सांगितले.
महापालिकेकडून समाविष्ट गावांत देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत आमदार शिवतारे यांनी विधीमंडळ अधिवेनशात प्रश्न उपस्थित केले होते. यापार्श्वभूमीवर पालिकेत सदर बैठक झाली. आमदार शिवतारे यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी गावांच्या कर आकारणी बाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी आजपर्यंत का झाली नाही? असा सवाल केला. यावेळी महापालिका आयुक्त डाॅ. भोसले म्हणाले की, शासनाच्या आदेशाची पुढील दोन महिन्यात अंमलबजावणी केली जाईल. त्याबाबतचे आदेश मिळकतकर विभागास दिले जातील. त्यानुसार, पुढील बीले नागरिकांना पाठविण्यात येतील.
हेही वाचा – शिधापत्रिका धारकांसाठी मोठी बातमी; आता वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा अधिक असल्यास…
काय आहेत शासनाचे आदेश ?
विधानसभा निवडणूकीपूर्वी राज्य शासनाने महापालिकेत समाविष्ट ३२ गावांच्या शास्तीकर वसूलीला स्थगिती दिली आहे. तसेच, महापालिकेने या गावांसाठी आकारण्यात येणारा मिळकतकर ग्रामपंचायतीच्या दुप्पट असू नये, असे आदेश दिले. मात्र, पालिकेकडून अद्यापही यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. शासनाने या बाबतचा प्रस्तावही पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, महापालिकेने अद्यापही असा प्रस्ताव पाठविलेला नाही.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
पुढील दोन महिन्यांत कार्यवाही करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिले. ग्रामपंचायतीच्या धरतीवर कराची आकारणी होऊन सुधारित नवीन बिले पुढील काही दिवसांमध्ये सर्वांना प्राप्त होतील. ३२ गाव कृती समितीच्या लढ्याला आलेले हे यश आहे.
– अविनाश लगड ( ३२ गावे कृती समिती सदस्य)