Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

‘रुग्णावरील उपचार दाव्याची रक्कम त्याच महिन्यात अदा करण्यात येणार’; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

पुणे : एकत्रित आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंगीकृत रुग्णालयाच्या सेवेत १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येईल, रुग्णांवर उपचार केल्यानंतर दावे (क्लेम) मागणीबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यास त्याच महिन्यात दाव्याची रक्कम अदा करण्यात येईल, रुग्णालयाच्या मागणीप्रमाणे आगामी काळात दरामध्ये (पॅकेज) वाढ करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी येथे राज्य आरोग्य हमी सोसायटी सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयोजित वंदनीय बाळासाहेब ठाकरे-जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कार सोहळा आणि अंगीकृत रुग्णालय संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे, सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद जगताप, पद्मश्री पोपटराव पवार आदी उपस्थित होते.

एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणीत योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे अभिनंदन करून श्री. आबिटकर म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. तसेच राज्यातील प्रत्येक रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देशात ‘आरोग्य सेवेत महाराष्ट्र सर्वोत्तम’ राज्य असले पाहिजे, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आग्रह आहे.

राज्यातील गरजू रुग्णांना एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील रुग्णालयावर ५ लाखापर्यंत मोफत उपचार करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला असून या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता राज्य राज्यशासन आणि रुग्णालय मिळून काम करीत आहे. एकही रुग्ण रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही याकरीता दक्षता घेण्यात येत आहे.

मंत्री आबिटकर पुढे म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत मिळणाऱ्या रक्कमेतून ८० टक्के रक्कम रुग्णालयाकरिता आणि २० टक्के रक्कम राज्य आरोग्य हमी सोसायटी राखीव निधीकरिता राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला यामाध्यमातून ५ लाख रुपयाच्या पुढील शस्त्रक्रियेकरिता रुग्णालयांनी उपयोग करण्याचे आवाहन केले. राज्य शासनाच्यावतीने १०८ क्रमांकाच्या २५० रुग्णवाहिका लवकरच नागरिकांच्या सेवेकरिता उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या रुग्णवाहिका शासकीय रुग्णालयासोबतच योजनेशी संलग्न रुग्णालयांकरिता उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयुष्यमान भारत कार्ड काढणाऱ्या आशा कार्यकर्त्या, स्वस्त धान्य दुकान चालक आदींना ५ रुपये ऐवजी ३० रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे १०० टक्के आयुष्यमान कार्ड गतीने काढण्यासोबतच प्रत्येक नागरिक रुग्णालयांशी संलग्न होईल, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयुष्मान भारत कार्डचे अतिशय चांगले काम झाले असून त्याच पद्धतीने राज्यातही काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा मंत्री आबिटकर यांनी व्यक्त केली.

हेही वाचा –  ‘क्रीडा धोरणात प्राधान्याने ‘एक खेळ एक संघटने’चा समावेश करा’; मंत्री माणिकराव कोकाटे

राज्य शासनाच्यावतीने रुग्णालयाला विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे, त्यामुळे रुग्णालयांनीदेखील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवांचा लाभ देण्याचे काम करावे. कोणत्याही आपत्कालिन परिस्थितीला सामोरे जाण्याचा तयारी ठेवावी, त्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व पायाभूत आरोग्य सुविधा उभारण्यावर भर द्यावा. उत्कृष्ट काम करणाऱ्या रुग्णालयांच्या कामाची दखल घेऊन इतर रुग्णालयांनीदेखील त्याच पद्धतीने काम करावे. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या रूग्णालयाच्या पाठीमागे राज्य शासन भक्कमपणे उभे राहील. संवाद कार्यक्रमात रुग्णालय प्रतिनिधीच्यावतीने केलेल्या सूचनांचा सकारात्मक पद्धतीने विचार करण्यात येईल, असेही मंत्री आबिटकर म्हणाले.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात रुग्णवाहिका, रक्तदान शिबिराचा आरोग्य सेवेला लाभ झाला, त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याने पुरस्कारार्थ्यांची जबाबदारी वाढली असून यापुढेही अधिक चांगले काम करण्याचा संकल्प करुया, असे आवाहन मंत्री आबिटकर यांनी केले.

खासदार बारणे म्हणाले, राज्य शासनाच्यावतीने वैद्यकीय क्षेत्रात अतिशय चांगले काम होत असून विविध लोककल्याणकारी योजना अंमलबजावणी करण्यात येत आहे. एकत्रित आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना लाभ होत आहे. खासगी रुग्णालयाच्या वैद्यकीय देयकाबाबत येणाऱ्या अडीअडचणी सोडवून रुग्णांना न्याय देण्याचे काम करावे, असेही खासदार बारणे म्हणाले.

डॉ. शेटे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यानंतर एकत्रित आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. राज्यात विविध रुग्णालये चांगली कामे करीत आहेत. यापुढेही नागरिकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करुन नागरिकांची सेवा करावी, सामान्य नागरिक आरोग्य सुविधेपासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन डॉ. शेटे यांनी केले.

आरोग्य मंत्री चव्हाण यांनी प्रस्ताविकात म्हणाले, एकत्रित आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये २ हजार ४७३ रुग्णालयाचा समावेश करण्यात आले आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारे उपचारदेखील या योजनेत समावेश केले आहेत. राज्यात योजनेत रुग्णालय अंगीकृतकरिता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची प्रणाली लागू करण्यात येणार असून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपद्धतीने होणार आहे. उपचारात आणि दरात वाढ, रुग्णालय श्रेणीवाढ, रुग्णालय गुणवत्तावाढीला प्रोत्साहन, आकंक्षित गटातील रुग्णालयांना अतिरिक्त १० टक्के नियमित प्रोत्साहनपर रक्कम, रुग्णालयांना दाव्याची रक्कम महिन्यात अदा करण्याचा निर्णय, यामुळे नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे. रुग्णालयानी योजनेची माहिती, त्याअंतर्गत करण्यात येणाऱ्या उपचाराबाबतची माहिती दर्शनी भागात लावण्यात यावी, असेही आरोग्य मंत्री चव्हाण म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button