देशभरात श्री राम नवमीचा उत्साह; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाशिमच्या दौऱ्यावर, पोहरादेवी येथे सपत्नीक करणार शासकीय पूजा

Ram Navami 2025 : देशभरात आज (6 एप्रिल) श्री राम नवमीचा उत्साह बघायला मिळत आहे. देशभरातील तमाम मंदिरे आकर्षकरित्या सजली असून सर्वत्र श्री राम भक्तांमध्ये एक नवी ऊर्जा संचारल्याचे बघायला मिळत आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीच्या दर्शनासाठी वाशिमच्या दौऱ्यावर असणार आहे. वाशिमच्या पोहरादेवीत रामनवमी निमित्त मोठ्या यात्रा महोत्सवाचे आयोजन केलं जातं. या यात्रेला देश, विदेशातील बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येनं येत असतात आणि संत सेवालाल महाराज आणि जगदंबादेवीच्या चरणी नतमस्तक होत असतात.
अशातच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता देवेंद्र फडणवीस या देखील आज (6 एप्रिल) श्री राम नवमी निमित्य पोहरादेवी इथं नतमस्तक होण्यासाठी येणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रथमच सकाळी 10 :30 वा जगदंबा देवी, संत सेवालाल महाराजांची शासकीय पूजा होणार आहे. दर्शनानंतर 11 वाजता ते सभेला संबोधित करतील, अशी माहिती समोर आली आहे.
प्रभू रामचंद्र यांचा आज जन्मोत्सव सोहळा देशभरात मोठ्या उत्साहत साजरा करण्यात येत आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात 131 वा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त देशभरातून लाखो भाविक आणि शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्या असून आज सकाळपासूनच मोठ्या आनंदात भाविक संत गजानन महाराज आणि प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घेत आहेत. जवळपास दीड लाख भाविक सध्या शेगावात असून मंदिर प्रशासनाने सोहळा साजरा करण्यासाठी मोठी तयारी केली आहे. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी राम जन्मोत्सव शेगाव येथे साजरा होणार असून दुपारी बारा वाजता प्रमुख सोहळा साजरा होणार आहे.
हेही वाचा – तब्बल ६१ हजार पगार, मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी अर्ज मागवले, तरुणांनो, तातडीने अर्ज करा!
रामनवमीनिमित्त संत गजानन महाराज मंदिरात 131 वां राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त संत गजानन महाराज मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. राज्यभरातून शेकडो दिंड्या व लाखो भाविक शेगावात दाखल झाले असून भाविकांची संख्या लक्षात घेता आज रात्री आणि उद्या दिवसभर आणि रात्रभरही मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे.
नांदेडमध्ये आज रामनवमीच्या निम्मिताने शहरात भव्य शोभायात्रा निघणार आहे, त्यासाठी अनुचित प्रकार होऊ नये म्हणून शिवाजीनगर इथल्या अल्पसंख्याक समाजाच्या प्रार्थना स्थळासमोर बॅरिकेटची भिंतच उभारण्यात आलीय. पोलिसांनी तात्पुरत्या स्वरूपात शहरात शंभर CCTV कॅमेरे देखील लावले आहेत. रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतलाय. नांदेडमध्ये आज दुपारनंतर राम भक्तांची मोठी शोभायात्रा निघणार आहे.