शिवजयंतीनिमित्त पुणेकरांसाठी खास पर्वणी; शिवकालीन शस्त्र, वस्त्र अन् नाणी प्रदर्शन

पुणे : ‘अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवमहोत्सवाचे उद्घघाटन शनिवारी झाले. महोत्सवानिमित्त आयोजित प्रदर्शनात नागरिकांना विविध प्रकारची शस्त्रास्त्र, शिवकालीन वस्त्र, नाणी, धोप, तोफेचे गोळे, ढाली, मुघलकालीन तलवारी, विविध कुऱ्हाडी, वाघ नखे, बंदुकीचे विविध प्रकार, कट्यार आणि भाले नागरिकांना पाहता येणार आहे.
सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते शिव महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार सिद्धार्थ शिरोळे, शरदिनी काकडे, शिवमहोत्सवाचे अध्यक्ष विकास पासलकर, माजी उपमहापौर दीपक मानकर, ‘मराठा सेवा संघा’चे विठ्ठल जाधव, ‘राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन’चे कैलास वडघुले, सतीश शेलार, चंद्रकांत कदम आणि तानाजी शिरोळे यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा – बंजारा समाज भवनासाठी ५१ लाखाच्या निधीची आमदार सुनील शेळके यांची घोषणा
लाल महालात सकाळी नऊ ते रात्री नऊ दरम्यान मंगळवारपर्यंत (ता.१८) प्रदर्शन खुले राहणार आहे. शिवमहोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (ता. १८) सायंकाळी पाच वाजता एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवरायांच्या स्मारकावर दीपोत्सव आणि मशाल उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात ढाली, तलवारी, बिचवा, वाघ नखे यांचा समावेश आहे. वाघ नखे कसे असतात, ती कशी वापरली जातात, याची माहिती मुले विचारतात. त्यांना या वस्तुंचे जास्त अप्रूप आहे, अशी माहिती शस्त्र प्रदर्शन मांडलेले महेश पवार आणि अजय शिंदे यांनी दिली.
पासलकर यांनी शिवमहोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. प्रशांत धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. विराज तावरे यांनी आभार मानले. समितीचे सचिन भामरे, मंदार बहिरट, अक्षय रणपिसे, सचिन जोशी, नीलेश इंगवले, मुकेश यादव, सचिन भामरे आणि अभिषेक वडघुले यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
लाल महाल अनेक ऐतिहासिक वस्तूंचा साथीदार आहे. अनेक महत्त्वाच्या घटना या ठिकाणी घडल्या आहेत. शिवाजी महाराजांचा दरारा हा स्त्रियांचे रक्षण करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी होता. छत्रपती शिवराय म्हणजे शस्त्रांचे शास्त्र जाणणारे आधुनिक शास्त्रज्ञ होते, असे काकडे म्हणाले.