बुडत्या जहाजाला कॅप्टन अडगळीतून थेट चिखलात !

अखेरची घरघर लागलेल्या आणि शेवटच्या घटका मोजत असलेल्या काँग्रेस पक्षाला शेवटी महाराष्ट्रात अध्यक्ष मिळाला आहे. गेली कित्येक दिवस या प्रश्नाचे घोंगडे भिजत पडले होते. नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सुद्धा तो स्वीकारला गेला नव्हता. पण, या बुडत्या जहाजाचा कॅप्टन होणार कोण ? या चर्चेत अडकलेल्या राजकारणाने अखेर कॅप्टन मिळाल्यामुळे सुटकेचा विश्वास टाकला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद माजी आमदार आणि बुलढाण्याचे बंटी ऊर्फ हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात टाकण्यात काँग्रेसला यश आले आहे ! एका वाक्यात सांगायचे झाले, तर एखाद्या बुडत्या बँकेचे अध्यक्षपद सपकाळ यांनी स्वीकारल्याची चर्चा आहे.
जुनीच दारू, नवीन बाटली !
अध्यक्षपद पाहिजे का हो अध्यक्षपद, असा बाजार काँग्रेसच्या नेत्यांनी मांडला होता, पण, अध्यक्षपद स्वीकारण्यासच काय तोंड दाखवण्यासही नेते तयार नव्हते. ज्याला विचारावे, तो नकार देतो, सारेच उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे काँग्रेसचे नेते, डुबत्या जहाजाचा कॅप्टन व्हायला एकही जण तयार होत नव्हता. शेवटी जबरदस्तीने का होईना, बुलढाण्याचे माजी आमदार बंटी ऊर्फ हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात एकदाची काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची माळ टाकली, आणि काँग्रेसच नव्हे तर सगळ्यांनीच नि:श्वास टाकला. जुन्याच बाटलीत नवीन दारू भरावी, तसा हा प्रकार झाला आहे!
चाचपणी युवा नेतृत्वाची अन् म्हाताऱ्यांचीही
वास्तविक पाहता, यासाठी एक अतिशय चपखल उदाहरण देता येईल. वयाने आणि शरीराने थोराड असलेल्या सरपंचाच्या पोरीला जर नवरा मिळत नसेल,तर सरपंच त्याच्याकडे रोजंदारीवर काम करणाऱ्या घरगड्याला घरजावई करून घेतो. अगदीच कुमारिका म्हणून काय जगायचे, त्यापेक्षा एखाद्याच्या गळ्यात हार आणि हात टाकून मोकळे व्हायचे, तसे प्रदेश काँग्रेसचे झाले होते. कारण ज्याला विचारावे, तो पळ काढायचा.. नकार द्यायचा.. तोंड लपवत फिरायचा..मग,विश्वजित कदमांसारख्या युवा नेतृत्वापासून ते धडाकेबाज सतेज ऊर्फ बंटी पाटील, विजय वडेट्टीवार यांच्यापर्यंत किंवा जख्खड म्हातारे झालेले नेतृत्व म्हणजे बाळासाहेब थोरात किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत अनेकांना आग्रहाने विचारण्यात आले. अगदी काठी टेकत टेकत चालणाऱ्या पुण्याच्या उल्हास पवारांकडे देखील काँग्रेसने आशाळभूत नजर टाकायला कमी केली नाही. शेवटी एकदाचा बंटी सपकाळांनी होकार दिला, बुडणाऱ्या झाडाला कॅप्टन मिळाल्याचा मोठा आनंद झाला!
नवरे बदलून उपयोग काय?
एका नटीने लग्न केले..तिला नवऱ्यापासून मूलबाळ झाले नाही..तो दररोज पाठ करून पुढच्या क्षणी तो डाराडूर झोपायचा..म्हणून तिने घटस्फोट देऊन दुसरा निवडला, लग्न केले! पण, त्यानेही त्याकाळी शंभर रुपयांसाठी नसबंदी करून घेतली होती, असे नवे नाटक पुढे आले. बाप रे, ती पुन्हा संकटात सापडली. तसे या काँग्रेसचे झाले आहे..म्हणजे, नवख्या बंटी सपकाळांपेक्षा अनुभवी आणि सतत चर्चेत राहणारे नाना पटोले यांच्यामध्ये काय कमी होती ? वाईट याचे वाटते, की या दिवसात काँग्रेसची थेट हेलन किंवा रेखा झाली आहे..जवानीत तिच्यासाठी उड्या आणि आता उरले सुरले नेतेही तिला स्वीकारायला तयार नाहीत..!
हेही वाचा : ‘सुरेश धस, धनंजय मुंडे आणि कराड एकच’; संजय राऊतांचा गंभीर आरोप
कोण आहेत हे बंटी सपकाळ ?
बुलढाणा जिल्ह्यातही फारसे चर्चिले गेलेले बंटी सपकाळ हे नाव नक्कीच नाही. त्या जिल्ह्यातील नेत्यांमध्ये विविधता क्वचितच आढळते, हर्षवर्धन सपकाळ त्याला काहीसे अपवाद आहेत, सामाजिक कार्य असो अथवा सांस्कृतिक चळवळ किंवा शेती तसेच राजकारण.. अगदी वेगळ्या ढंगाच्या बांधलेल्या बंगल्यापासून ते सातत्याने पस्तीस वर्षे थोर समाजसेवक वंदनीय बाबा आमटे यांच्या कार्यकर्त्यांबरोबर आदिवासी भागात न थकता, न थांबता सामाजिक कार्यात झोकून देणारा हा नेता बुलढाण्यासारख्या दुर्लक्षित जिल्ह्यात राहूनही आपले वेगळेपण जपतो..वेगळ्या ढंगाने, मिळविलेल्या पैशांचा विनियोग करतो! वयाने सर्वाधिक लहान असणारा हा एकेकाळचा जिल्हा परिषद अध्यक्ष, खिसे मोकळे करून चालणाऱ्या प्रदेश काँग्रेसचा खर्च किंवा कार्यालयीन पगार देखील कोठून आणायचा, हीच नेत्यांना भेडसावणारी चिंता, नानाभाऊ याच्या त्याच्या खिशात हात टाकून कसातरी खर्च भागवायचे, हे तर संपूर्ण जगाला माहित आहे.
शिवधनुष्य पेलणार का?
एकीकडे काँग्रेस जेरीस आलेली..कोणत्याच निवडणुकीत विजय दृष्टीपथात सुद्धा न येणारी..त्यात सध्याच्या अति बलाढ्य ‘महायुती’ समोर टिकाव धरायचा आहे आणि तो देखील साधी आमदारकीही नसताना.. म्हणजे एखाद्या कृष पैलवानाला कुस्ती खेळण्यासाठी महाराष्ट्र केसरी मिळवलेल्या पैलवानाच्या अंगावर सोडण्यासारखे ! एकेकाळी प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी काँग्रेसमध्ये मोठी चुरस असायची, आज काय ती अवस्था? जो तो तोंड लपवून नकार देतो आहे..शेवटी जरी जबरदस्तीने सपकाळांच्या तोंडात साखर कोंबली गेली असली तरी ती त्यांना कडू नक्कीच लागणार नाही.. यालाच खेड्यामध्ये जबरदस्तीचा रामराम म्हणतात, बरं का!
थोडक्यात सांगायचे तर काँग्रेसची बुडत चाललेली नौका आधी समुद्राच्या लाटांमधून वाचवायची आहे आणि मग ‘वल्हव रे नाखवा’ म्हणत तिला किनाऱ्यावर लावायचे आहे.. सध्या काँग्रेसकडे नाही विकासाच्या दृष्टिकोन, जनतेचे पाठबळ, आर्थिक सुबत्ता, योग्य अशी ध्येय धोरणे, त्यात पक्षाला विजयी कसे करणार ?, हा खरा आता सपकाळांपुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, सध्या मात्र त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा !