‘…लाडका गुन्हेगार योजना सुरू केल्याचं लक्षण’; रोहित पवारांची टीका

पुणे : पुण्यातील दहिहंडीच्या कार्यक्रमात कुख्यात गुंड गजानन मारणेने मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून सध्या विरोधकांकडून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली जात आहे. याआधी पार्थ पवार, निलेश लंके यांनीही गजानन मारणेची भेट घेतली होती त्यावेळीही त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. चंद्रकांत पाटील यांच्या व्हिडीओवर आमदार रोहित पवार यांनी देखील लाडका गुन्हेगार योजना म्हणत राज्य सरकावर टीका केली आहे.
रोहित पवार ट्वीट करत म्हणाले की, “मंत्र्यांनी गुन्हेगारांना सोबत घेऊन फिरणं म्हणजे या सरकारने लाडका गुन्हेगार योजना सुरू केल्याचं लक्षण आहे, परंतु विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारांच्या मदतीने जिंकण्याची स्वप्न पाहणाऱ्यांनी हा महाराष्ट्र आहे हे मात्र विसरू नये,” असे रोहित पवार यांनी महायुती सरकारला सुनावले आहे.
हेही वाचा – धक्कादायक! विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत महाराष्ट्र अव्वल, मुलांपेक्षा मुलींच्या अधिक आत्महत्या
पुढे ते म्हणाले, “असो! देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे खासदार पोलिसांना धमक्या देतात, पत्रकारांना धक्काबुक्की करतात, मंत्री गुंडांना भेटतात यालाच पार्टी विथ डीफरन्स म्हणायचं का? आपल्या याच आदरातिथ्यामुळं गुंडाचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला असून गुन्हेगारी वाऱ्याच्या वेगाने फोफावत चाललीय. गुंडांना राजाश्रय देण्याच्या आपल्या कृत्यामुळं दहशतीखाली असलेली सामान्य जनताच आपल्याला योग्य वेळी चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.”





