breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

लोकसंवाद : अतिक्रमण कारवाईविरोधातील आंदोलन पिंपरी विधानसभेच्या मैदानात!

माजी नगरसेविका सीमा सावळे यांचे विधानसभा ‘मिशन- २०२४’
आसवाणी बंधूंच्या साथीने व्यापाऱ्यांच्या समस्या सोडण्यास पुढाकार

पिंपरी । विशेष प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने पिंपरी कॅम्पात कारवाई केली. या कारवाईत व्यापारी आणि कर्मचारी यांच्यात वादंग झाला. या वादात माजी नगरसेविका सीमा सावळे यांनी उडी घेतली. त्याला आंदोलनाचे स्वरुप प्राप्त झाले. या आंदोलनातील घोषणाबाजी विधानसभेत गुंजणार, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहातील ‘डॅशिंग’ नगरसेविका म्हणून सीमा सावळे यांची ओळख आहे. शिवसेनेत असताना आक्रमक आंदोलन करणाऱ्या सावळे यांनी २०१७ मध्ये भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. बालाजीनगर- इंद्रायणीनगर हा सावळेंचा ‘होमपीच’ प्रभाग म्हणून ओळखला जातो. महापालिकेवर प्रचंड वचक असलेल्या सावळे यांना २०१७ मध्ये स्थायी समिती सभापतीपदाची संधी मिळाली. एक वर्षे मिळालेला स्थायी समितीपदाचा कार्यकाळ सावळे यांनी गाजवला.

दरम्यान, राजकीय महत्त्वाकांक्षा मोठी असल्यामुळे सावळे यांनी २०१९ मध्ये आपले मूळगाव अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली. वास्तविक, भाजपातील पक्षश्रेष्ठींच्या सल्ल्यानेच त्यांनी दर्यापूरची तयारी सुरू केली होती. मात्र, ऐनवेळी त्यांची उमेदवारी डावलण्यात आली आणि त्यामुळे सावळे यांनी अपक्ष रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत सावळे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर शहराच्या राजकारणापासून काहीकाळ अलिप्त राहण्याची भूमिका सावळे घेतल्याचे पाहयला मिळाले.

२०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका सत्ताधारी भाजपाच्या स्थानिक नेत्यांसोबत सावळे यांचे अंतर्गत मतभेद झाल्याची चर्चा सुरू झाली. भाजपाच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये सावळेंच्या अनुपस्थितीने यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतरच्या काळात सावळे यांनी ‘एकला चालो रे’ची भूमिका घेतली. महापालिका प्रशासनातील चुकीच्या कामांवर ‘प्रहार’ करणाऱ्या सावळे यांनी सर्वसामान्य नागरिकांची बाजू प्रकर्षाने मांडण्याची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे शहराच्या राजकारणात सावळे यांनी आपला पुन्हा दबदबा निर्माण करण्यासाठी नवी रणनिती आखल्याचे पहायला मिळत आहे.

२०१९ मध्ये सीमा सावळे पिंपरी विधानसभा निवडणूक लढवतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी निर्णय बदलला. त्यामुळे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे, शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार असा सामना रंगला होता. यामध्ये बनसोडे यांनी बाजी मारली. मात्र, गेल्या ४ वर्षांत आमदार बनसोडे यांची मतदार संघावरील पकड ढिली झाली आहे. राष्ट्रवादीतून माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनीही ताकद लावली होती. आता शिवसेनेकडून जितेंद्र ननावरे हेसुद्धा विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहेत.

आसवांनी बंधुचे सावळेंना समर्थन?
माजी स्थायी समिती सभापती आणि राष्ट्रवादीचे नेते ढब्बू आसवानी आणि व्यापारी संघटनेते मातब्बर नेते श्रीचंद आसवाणी यांनी अतिक्रमण कारवाई विरोधात सीमा सावळे यांना साथ दिली. किंबहुना, एकत्रितपणे आंदोलन करण्यात आले. प्रभागाबाहेरील आंदोलनात सावळे सहभागी होतात आणि त्याला राष्ट्रवादीतील माजी नगरसेवकांची साथ मिळते, हा योगायोग निश्चितपणे नाही. पिंपरी कॅम्पातील व्यापारी हा विधानसभा निवडणुकीत निर्णायक मतदार ठरणार आहे. या मतदाराला स्थानिक आणि बाहेरचा अशी झालर नाही. त्यामुळे सावळे यांनी पिंपरी विधानसभा मतदार संघाची मशागत अत्यंत अचूक ठिकाणी सुरू केली आहे. भाजपासह शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यापैकी कोणत्याही पक्षाकडून तिकीट घेतल्यास सीमा सावळे मैदान मारतील, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
समाजाची मोट बांधण्याचे आव्हान…
पिंपरी मतदार संघ अनुसूचित जातीसाठी आरक्षीत आहे. या समाजातून येणारे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांचा जनसंपर्क गाववाले, गावकी-भावकी असा दांडगा आहे. किंबहुना, मतांची गोळाबेरीज आणि मुख्य पुढाऱ्यांना ऐनवेळी आपल्या बाजुने वळवण्याची हातोडी बनसोडे यांच्याकडे आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये बनसोडेंचा आपल्याच समाजाशी असलेला संपर्क कमी झाला आहे, अशी नाराजी अनेकदा बोलून दाखवली जाते. महापालिका निवडणूक किंवा शहराच्या राजकारणात बनसोडे समर्थक नगरसेकांना ताकद मिळत नाही, अशी खंतही खासगीत बोलून दाखवली जाते. त्यामुळे आंबेडकरी समाजाच्या प्रभावी नेतृत्वाची जी पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरुन काढण्याचे आव्हान सीमा सावळे यांना पेलावे लागणार आहे. यासह माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, माजी नगरसेविका चंद्रकांत सोनकांबळे, सुलक्षणा शिलवंत-धर, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांच्यासह विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी दोन हात करण्याची तयारी सावळे यांना ठेवावी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button