breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडलेख

लोकसंवाद : ‘एक फूल दो माली… महापालिका आयुक्त अन् भाजपा आमदारांमध्ये ‘खलबली’’

पिंपरी । अधिक दिवे

राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आल्यानंतर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना ‘ताकद’ मिळाली. त्याला महापालिकेतील आयुक्त राजेश पाटील आणि अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची तगडी साथ मिळाल्यामुळे भाजपा आमदारांच्या नाड्या आवळण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे भाजपाची राम-लक्ष्मण जोडी अडचणीत येईल का? असा प्रश्न आहे. सध्याची राजकीय स्थिती म्हणजे ‘एक फूल दो माली आणि महापालिकेत खलबली…’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

महापालिकेत भाजपा सत्ता आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाला पुन्हा ‘कमळ’ फुलवाचे आणि महाविकास आघाडीलाही ‘भगवा’ फडकवायचा आहे.

राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थापन झाले. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ मिळाली. मात्र, सत्ता स्थापनेनंतर राज्यात कोरोना, महापूर, निसर्ग चक्रीवादळ, कोरोना-२, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण अशा अनेक संकटांचा समाना करावा लागला. त्यामुळे राज्य सरकार आणि राज्य सरकारच्या मार्फत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंपरी-चिंचवडमध्ये इच्छा असूनही फारसे लक्ष देता आले नाही.

तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डिकर यांची बदली झाली. हर्डिकर हे भाजपाचे ‘घरगडी’ आहेत, अशी टीका त्यावेळी राष्ट्रवादी- शिवसेनेकडून करण्यात आली होती. दरम्यान, राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार राजेश पाटील यांनी स्वीकारला. तर अतिरिक्त आयुक्त म्हणून विकास ढाकणे रुजू झाले. या जोडीने आपले बस्थान बसवण्यासाठी भाजपाच्या ‘राम-लक्ष्मण’ जोडीला ‘कॉर्नर’ करण्याची भूमिका ठेवली. मग, अगदी आर्थिक दुर्बल घटकांना मदत देण्याच्या विषयापासून मागासवर्गीय बांधवांना मदत करण्याचा विषयापर्यंत भाजपा पदाधिकाऱ्यांचे मुद्दे हाणून पाडण्यात आले.

गेल्या महिनाभरात आयुक्त राजेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा धडाका लावला. यात प्रमोशन द्यायचे आणि बदलही करायची…अशी सावध खेळी केली. यात अधिकाऱ्यांचा रोष न घेता, भाजपा आमदारांशी संबंधित अधिकाऱ्यांना धडा शिकवला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेतील ‘लिफ्टमन’ पासून सह शहर अभियंतापर्यंत आयुक्त पाटलांनी भाजपाच्या दोन्ही आमदारांना मदत करणारे अधिकारी- कर्मचारी यांचा बदलीअस्त्र वापरून ‘करेक्ट कार्यक्रम’ केला.

पण भाजपा आमदार ‘सरेंडर’ झाले नाही…

महापालिका आयुक्तांनी पहिल्या दिवसापासून भाजपाच्या दोन्ही आमदारांना शह देण्याचा प्रयत्न केला. महापालिका सभा किंवा महापौरांनी घेतलेल्या आर्थिक मदतीला तात्रिक विरोध करीत तो प्रस्ताव दप्तरी दाखल झाला. अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि विकासकामांतील चौकशींचा ससेमिरा सुरू केला. शहरात सुरू असलेले प्रकल्प हे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत की नाहीत? याचा अभ्यास आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी सुरू केला. अमृत योजना, आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांचा विषय, कर संकलन विभागाचे कारवाई हे सर्व त्याचीच उदाहरणे आहेत. मात्र, राजकारणातील अनुभवी मातब्बर आणि पवारांच्या तालमीत तयार झालेले ‘राम- लक्ष्मण’ आयुक्तांच्या तावडीत अद्याप सापडलेले नाहीत. दोन्ही आमदारांची अवस्था ‘त्या’ मांजरासारखी आहे. जे कितीही उंचावरून फेकले, तरी लिलया चार पायांवर पडते आणि त्याला कसलीही दुखापत होत नाही. उभे टाका, तिरके टाका किंवा आडवे टाका…ही चतूर मांजरं आपल्या पायावर खंभीरपणे उभी राहतात.

‘गुरूजी’मध्ये राष्ट्रवादीशी संबंधित लोकांचा सहभाग?

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कामगारांची आर्थिक पिळवणूक केल्याप्रकरणी एका भाजपा आमदारांच्या निकटवर्ती व्यक्तीच्या कंपनीवर कारवाई केली, अशी चर्चा आहे. अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, यापैकी काहीलोक राष्ट्रवादीचे माजी नगरसेवकाचे नातेवाईक आणि कार्यकर्ते असल्याचे बोलले जाते. कचरा संकलन करणाऱ्या कंपनीवर कारवाई केली होती. अशाच प्रकारे कारवाई करण्याचा धडाका आयुक्तांनी लावला, तर त्यापैकी अनेक कंपन्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील नेत्यांशी निकटवर्तीयांच्या आहेत. त्यामुळे आयुक्तांना सावध पवित्रा घ्यावा लागतो.

प्रवीण लडकत यांच्या बदलीची दुसरी बाजू…

महापालिका पाणीपुरवठा विभागतील प्रवीण लडकत यांची बदली करण्यात आली. विशेष म्हणजे, लडकत यांना पदावनती करण्यात आले. पाणी पुरवठा विभागाचे कामकाज विस्कळीत झाले, तर त्याचा फटका सत्ताधारी भाजपाला बसणार आहे. त्यासाठीच लडकत यांच्यावर बदलीची कारवाई केली का? असा प्रश्न आहे. भाजपा आमदारांच्या नांग्या ठेचण्यासाठीच प्रशासन काम करीत आहे. दुसरीकडे, टाटा मोटर्स कंपनीवर कर संकलन विभागाने कारवाई केली. पालिकेतील सत्ताधारी भाजपावर टाटा कंपनीसह कामगारांचाही रोष ओढावणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी, आगामी महापालिका निवडणूक आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजपा यांच्यामधील सत्तासंघर्ष आणखी रौद्ररुप धारण करणार आहे. अमृत योजनेतील प्रकल्पांचे महाभारत सुरू आहे. टेक महिंद्रा आणि स्पर्ष हॉस्पिटलशी संबंधित कारवाई ही बाब प्रकर्षाने जाणवते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button