दोन समाजांना भिडवण्याचं कारण काय? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे यांच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. छगन भुजबळ यांच्यासह राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी जालन्यातल्या आंबड येथे ओबीसी एल्गार मोर्चा काढला. यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. दरम्यान, यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, संविधानाच्या चौकटीत राहून मराठ्यांना आरक्षण देता येईल. ओबीसींची मागणी आहे की त्यांना वेगळं ताट हवं, तर मराठा समाजाची मागणी आहे की त्यांनाही वेगळं ताट हवं. मला असं वाटतं की, त्यांची ही मागणी संविधानाच्या चौकटीत राहून आपण पूर्ण करू शकतो. असं असतांना दोन समाजांना भिडवण्याचं कारण काय? असा सवाल उपस्थित केला.
हेही वाचा – भोसरीत रंगणार नाईट हाफपीच क्रिकेट स्पर्धा
जरांगे पाटील यांनी जालन्यातल्या गावातून आंदोलन सुरू केलं. त्याच जालन्यातल्या आंबड तालुक्यात छगन भुजबळ गेले. जरांगेंना आव्हान देण्यासाठी भुजबळ तिथे गेले. माझं म्हणणं आहे की, राजकारणात एकमेकांना आव्हान कशाला देताय? या मातीत आपण जगलो आणि याच मातीत एकत्र राहणार आहोत. प्रत्येक प्रश्न घटनेच्या चौकटीत राहून सोडवता येतो. आमच्या कायदेशीर सल्लागार पथकाने म्हटलं आहे की, घटनेच्या चौकटीत राहून कोणाचंही आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला आरक्षण देता येईल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.