Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

तुम्हाला दहशतवादी हल्ला, अपघात टाळता येत नाहीत, मग सत्तेत कशाला बसलाय? संजय राऊतांचा सवाल

मुंबई | अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केलेलं एअर इंडियाचं विमान गुरुवारी (१२ जून) दुपारी नागरी वस्तीत कोसळलं. या भीषण अपघातात विमानातील २२९ प्रवासी आणि १२ कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. केवळ एक प्रवासी या दुर्घटनेतून बचावला आहे. तसेच हे विमान मेघानीनगरमधील नागरी वस्तीत कोसळल्यामुळे काही रहिवाशांचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या २६५ वर गेली आहे. या अपघातानंतर भारतासह जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले, तपासण्या करून तंत्रज्ञांनी विमानाच्या उड्डाणासाठी परवानगी दिल्यानंतर विमानाने उड्डाण केलं, त्यानंतर ३० सेकंदात विमानाची दोन्ही इंजिनं बंद पडली, हे कसं काय घडलं? नेमकी काय गडबड झाली? याची चौकशी केली जाईल. त्या चौकशीतून काहीतरी निष्पन्न होईल, कदाचित सत्य समोर येईल. मात्र या २६५ मृत्यूंची जबाबदारी कोण घेणार? विमानातील २४२ जण, जिथे विमान कोसळलं तिथले डॉक्टर, विद्यार्थी असे मिळून २६५ जण दगावले आहेत. त्यांच्या मृत्यूंची जबाबदारी कोण घेणार आहे?

हेही वाचा    :      डीजीसीएने आधीच कारवाई का नाही केली? विमान अपघातावरून राज ठाकरेंचा सवाल 

काल दुर्घटनेनंतर अमित शाहांनी घटनास्थळी भेट दिली आणि म्हणाले की ‘हा अपघात होता, अपघात टाळता येत नाहीत’. मला त्यांना विचारायचं आहे की तुम्हाला अपघात टाळता येत नाहीत, तुम्हाला पहलगाममधील दहशतवादी हल्ला टाळता येत नाही. मग तुम्ही सत्तेत कशाला बसलाय? तुमच्या राज्यात (सरकार) कोणीच सुरक्षित नाही. रेल्वे प्रवासी सुरक्षित नाहीत, विमान प्रवासी सुरक्षित नाहीत. पर्यटक सुरक्षित नाहीत. मणिपूरची जनता सुरक्षित नाही. मग तुमच्या राज्यात नेमकं कोण सुरक्षित आहे? या प्रश्नांचं अमित शाहांनी उत्तर द्यावं, असं संजय राऊत म्हणाले.

सगळेच जण जबाबदारी झटकत आहेत. कोणाला तरी या घटनेची जबाबदारी घ्यावी लागेल. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी अथवा पंतप्रधानांनी या दुर्घटनेची जबाबदारी घ्यावी. मुंबईत व देशात कित्येक रेल्वे अपघात झाल्यानंतरही रेल्वेमंत्री त्याची जबाबदारी घेत नाहीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देशांतर्गत हल्ल्याची जबाबदारी घेत नाहीत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकावल्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूर ही मोहीम बंद करतो. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या अपयशाची जबाबदारी घेत नाहीत. मग तुम्ही भाजपावाले कसलं राज्य चालवताय? असाही सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button