डीजीसीएने आधीच कारवाई का नाही केली? विमान अपघातावरून राज ठाकरेंचा सवाल

Raj Thackeray on Air India Plane Crash | अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केलेलं एअर इंडियाचं विमान गुरुवारी (१२ जून) दुपारी नागरी वस्तीत कोसळलं. या भीषण अपघातात विमानातील २२९ प्रवासी आणि १२ कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. केवळ एक प्रवासी या दुर्घटनेतून बचावला आहे. तसेच हे विमान मेघानीनगरमधील नागरी वस्तीत कोसळल्यामुळे काही रहिवाशांचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या २६५ वर गेली आहे. या अपघातानंतर भारतासह जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही एक्सवर पोस्ट शेअर करत मृतांना श्रद्धांजली व्यक्त केली आहे. पण यानिमित्ताने त्यांनी काही परखड सवालही उपस्थित केले आहेत.
राज ठाकरे म्हणाले, विमान तंत्रज्ञानाबद्दल जरी मला खूप खोल माहिती नसली तरी माझ्या वाचनात काही गोष्टी याच्या आधी पण आल्या होत्या, त्यातून मला काही प्रश्न पडले. बोईंगच्या ‘ड्रीमलाईनर’ विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या. २०१३ ला पहिल्यांदा जपान एअरलाईन्सच्या विमानाला आग लागली होती. त्यानंतर या विमानाबद्दल अनेक तक्रारी येतच होत्या. त्या इतक्या होत्या की २०२० ते २०२३ या काळात अनेकदा या विमानांच उड्डाण थांबवले गेले होते. जानेवारी २०१३ ला तर अमेरिकेपासून युरोपपर्यंत जवळपास सगळ्या मोठ्या विमान प्राधिकरणांनी जवळपास ३ महिने बोईंग ड्रीमलाईनरचं उड्डाण खंडित केले होते. आणि मला आठवतंय त्याप्रमाणे २०१३ ला भारतात डीजीसीएने देखील काही काळासाठी या विमानाचे उड्डाण खंडित केले होते.
हेही वाचा : PCMC | येत्या ३० जूनपर्यंत मालमत्ता कर भरून सवलतींचा लाभ घ्या!
राज ठाकरेंनी उपस्थित केले हे प्रश्न
जर ड्रीमलाईनर बद्दल इतक्या तक्रारी आहेत हे माहित असून सुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो?
डीजीसीएने यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली?
आजच्या विमान अपघाताविषयी वाचताना अजून एक माहिती समोर आली ती म्हणजे हे विमान २८ जानेवारी २०१४ ला एअर इंडियाच्या सेवेत आले. थोडक्यात जगभरात जेंव्हा ड्रीमलाईनरबद्दल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यात आणले, असेही राज ठाकरे म्हणाले.





