Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (शरदचंद्र पवार) २७ वा वर्धापनदिन साजरा होत असतानाच, राजकीय वर्तुळात पक्षाच्या काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी, शरद पवारांकडून विलीनीकरणाचा प्रस्ताव आधीच देण्यात आला होता, असा खळबळजनक खुलासा केला आहे. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. यामुळे या संभाव्य विलीनीकरणाबाबत महाविकास आघाडीतच (मविआ) संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काँग्रेस हायकमांडने दिल्लीत बोलावलेल्या बैठकीला जात असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, “शरद पवारांकडून राष्ट्रवादी विलीनीकरणाचा प्रस्ताव आधीच देण्यात आला होता, पण काही कारणास्तव त्याला विलंब झाला.” देश पातळीवर समविचारी पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्याचाच एक भाग म्हणून तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) विलीनीकरणाचा विचार करत असल्याचे पटोलेंनी सांगितले. या प्रक्रियेला गती आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र या विषयावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास टाळले आहे.

हेही वाचा

ODI World Cup 2027 च्या तारखा ठरल्या! पाहा कधी आणि कुठे होणार सामने..

प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी दावा फेटाळला

नाना पटोले यांनी केलेला विलीनीकरणाचा दावा राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तातडीने फेटाळून लावला आहे. सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, “काँग्रेस किंवा आमच्या पक्षाकडून विलीनीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही. असा काही प्रस्ताव असता तर वरिष्ठांकडून आम्हाला नक्कीच माहिती देण्यात आली असती.” सिल्वर ओकवरील बैठकीत केवळ पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली असून विलीनीकरणाचा कोणताही विषय अजेंड्यावर नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.

मजबूत काँग्रेससाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा: संजय राऊत

या संपूर्ण वादात शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी एक महत्त्वाची भूमिका मांडली आहे. राऊत म्हणाले, “सध्या देशाची परिस्थिती पाहता एक मजबूत आणि प्रबळ काँग्रेस देशात पर्याय म्हणून उभी राहणे गरजेचे आहे. भूतकाळात काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या लहान पक्षांनी देशाच्या हितासाठी एकत्र आले पाहिजे. या अखंड काँग्रेससाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी पुढाकार घेतला किंवा त्याचे नेतृत्व केले, तर हा विचार नक्कीच पुढे जाईल.”

सुप्रिया सुळेंची सावध प्रतिक्रिया

संजय राऊत यांच्या या भूमिकेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “संजय राऊत हे देशाच्या हितासाठी अतिशय परखडपणे मत मांडत असतात. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. राऊत हे माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत, त्यामुळे त्यांनी दिलेल्या या महत्त्वपूर्ण सूचनेची नोंद आमचा पक्ष नक्कीच घेईल.”

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त सुरू झालेल्या या विलीनीकरणाच्या चर्चेमुळे आगामी काळातील महाविकास आघाडीच्या अंतर्गत समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button