७ वी जिल्हास्तरीय युनिफाईट स्पर्धा: ‘न्यू इंग्लिश मीडियम स्कूल’च्या १६ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!

पिंपरी चिंचवड:
येथील ७ वी जिल्हास्तरीय युनिफाईट स्पर्धा नुकतीच (५ जुलै २०२६ रोजी) कावेरी नगर क्रीडा संकुल वाकड येथे अत्यंत नेटके नियोजन आणि भव्य दिव्य वातावरणात दिमाखात पार पडली. या स्पर्धेत पिंपरी चिंचवडमधील सुमारे २० शाळांमधून १८५ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. या सर्व शाळांमधून ‘न्यू इंग्लिश मीडियम स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट आणि स्पर्धात्मक खेळाच्या जोरावर मैदान मारत शाळेच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला. या शाळेतील एकूण १६ विद्यार्थ्यांची आता आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मान्यवरांची उपस्थिती अन् कौतुकाची थाप
या भव्य क्रीडा स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्री. अभिषेक (भाऊ) बारणे, क्रीडा समिती सदस्य तथा नगरसेवक श्री. तानाजी (भाऊ) बारणे, मनपाचे कर्तव्यदक्ष क्रीडा अधिकारी श्री. दीपक कान्हेरे सर आणि मिलेनियम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. विजय पवार सर आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “खेळामुळे जीवनाला एक नवी दिशा मिळते,” असे सांगत मान्यवरांनी पिंपरी चिंचवड युनिफाईट संघटना या खेळाच्या प्रसारासाठी घेत असलेल्या मेहनतीचे कौतुक केले. तसेच, शहरात दिवसेंदिवस युनिफाईट खेळाडूंची संख्या आणि दर्जा वाढत असल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला.
हेही वाचा – ‘सोमनाथ मंदिर आस्थेच्या केंद्रासोबतच राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतीक’; मंत्री ॲड. आशिष शेलार
सातारा येथील ‘राज्यस्तरीय’ स्पर्धेचे वेध
स्पर्धेत न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या १६ विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन घडवले. या विजेत्या सर्व खेळाडूंची आगामी २२ आणि २३ ऑगस्ट रोजी सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय युनिफाईट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
संस्था व मुख्याध्यापकांकडून पाठीवर शाबासकी
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल मिलेनियम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. विजय पवार सर, सचिव श्री. अशोक मोरे सर, खजिनदार सौ. सुरेखा पवार मॅडम, मुख्याध्यापिका विद्या नाईक मॅडम आणि नायगम अग्निस मॅडम यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे भरभरून कौतुक केले.
या यशाचे खरे शिल्पकार ठरलेले शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. यशवंत माने सर यांना संस्थेच्या वतीने कौतुकाची थाप देण्यात आली. तसेच, भविष्यात अशाच प्रकारे जास्तीत जास्त कौशल्यवान व गुणवान खेळाडू घडवण्यावर भर द्यावा, अशा सदिच्छाही मान्यवरांनी यावेळी दिल्या.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“आमच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय युनिफाईट स्पर्धेत मिळवलेले यश अतिशय अभिमानास्पद आहे. १६ विद्यार्थ्यांची थेट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झालेली निवड ही संस्थेच्या दर्जेदार क्रीडा संस्कृतीची पावती आहे. क्रीडा शिक्षक यशवंत माने सर यांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळेच हे शक्य झाले. सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेतही आमचे खेळाडू अशीच उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा व शहराचा नावलौकिक वाढवतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. सर्व विजेत्या खेळाडूंना संस्थेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा!”
— श्री. विजय पवार
(अध्यक्ष, मिलेनियम एज्युकेशन सोसायटी)





