Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची स्त्री शिक्षणाची परंपरा एसएनडीटीने समृद्ध केली’; राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी उभारलेल्या स्त्री शिक्षणाच्या महान परंपरेला पुढे नेत एसएनडीटी महिला विद्यापीठाने शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात देशासाठी आदर्श कार्य केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे हे विद्यापीठ बहुविषयक शिक्षण, संशोधन, उद्योजकता आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे वाटचाल करत असून देशातील अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान मिळविण्याची क्षमता त्यात असल्याचा विश्वास महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी व्यक्त केला.

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या १११व्या स्थापना दिनानिमित्त कर्वे रस्ता येथे आयोजित कार्यक्रमात भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच ‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’ चे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी, राज्यपालाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव, कुलसचिव प्रा. डॉ.विलास नांदवडेकर, व्यवस्थापन परिषद व शैक्षणिक परिषदेचे सदस्य, प्राध्यापक, माजी विद्यार्थीनी आणि विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, भारतरत्न महर्षी कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य हे सामाजिक परिवर्तनाचे नव्हे तर राष्ट्रनिर्मितीचे कार्य होते. स्त्री शिक्षणाद्वारे महिलांचे सक्षमीकरण हा विकसित भारताचा पाया आहे. विद्यापीठांनी केवळ अध्यापन केंद्र न राहता संशोधन, नवोपक्रम, समस्या निराकरण आणि राष्ट्रनिर्मितीची केंद्रे बनले पाहिजेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, हवामान बदल, आरोग्य, कृषी आणि सामाजिक उद्योजकता यांसारख्या क्षेत्रांत विद्यार्थिनींनी संशोधन व नवोपक्रमावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा –  ‘विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व सुलभ शिक्षणप्रवासासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध’; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’ हे संशोधनाचे उद्योगांमध्ये, कल्पनांचे उपयुक्त उपायांमध्ये आणि तरुणांच्या संकल्पनांचे स्टार्टअपमध्ये रूपांतर घडविणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे सांगत त्यांनी विकसित भारत २०४७ साकार करण्यासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील विकास अपरिहार्य असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ म्हणाले, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली. त्या विचारांचे संस्थात्मक रूप म्हणजे एसएनडीटी महिला विद्यापीठ होय. आज महिलांनी विज्ञान, संशोधन, संरक्षण, प्रशासन, उद्योग, विमान वाहतूक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यामागे शतकापूर्वी पेरलेल्या स्त्री शिक्षणाच्या बीजांचे मोठे योगदान आहे. विकसित भारताच्या निर्मितीत महिलांचे नेतृत्व निर्णायक ठरणार असून या वाटचालीत एसएनडीटी महिला विद्यापीठाचे योगदान महत्त्वाचे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यसभा सदस्य डॉ. मेधा कुलकर्णी यांनी महर्षी कर्वे यांनी स्वतःच्या आचरणातून समाजसुधारणेचा आदर्श घालून दिला, असे सांगत विद्यापीठाने महिला शिक्षण, नवोपक्रम आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उभारलेली परंपरा गौरवास्पद असल्याचे नमूद केले. कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

प्रास्ताविकात कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव यांनी महर्षी कर्वे यांचा पुतळा हा त्यांच्या विचारांचा आणि स्त्री सक्षमीकरणाच्या चिरंतन मूल्यांचा प्रेरणास्त्रोत असल्याचे सांगितले. ‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’ मुळे उद्योग, शासन, स्टार्टअप, संशोधक आणि विद्यार्थिनींना एकत्र आणणारी सक्षम नवोपक्रम परिसंस्था निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात एसएनडीटी महिला विद्यापीठातील विविध ज्ञानशाखेतील विशेष प्रविण्यप्राप्त विद्यार्थ्यांनींचा, प्राध्यापक आणि प्राध्याकेत्तर कर्मचाऱ्यांचा क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमापूर्वी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या १११ व्या स्थापना दिनानिमित्त भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी ‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’चे उद्घाटन केले. यावेळी विद्यार्थिनींच्या नवोपक्रमातून साकारलेल्या विविध प्रकल्प, उत्पादने व संशोधनाधारित प्रदर्शनीची पाहणी करून राज्यपालांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला तसेच त्यांच्या कल्पकता, संशोधनवृत्ती आणि नवोपक्रमशीलतेचे विशेष कौतुक केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button