‘फलटणच्या विकासाचा आमच्याकडे कार्यक्रम’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा : आमच्याकडे विकासाचा कार्यक्रम असताना मी जे करून दाखवलंय ते मी बोलतो. त्यामुळे कुठलीही टीका न करता खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवण्याकरता या निवडणुकीत मी आलेलो आहे. सकारात्मकपणे मत मागण्याकरता आलो असून फलटणला आम्ही आधुनिक शहर बनवू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथील जाहीर सभेत बोलताना दिले.
यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, समशेरसिंह निंबाळकर, आमदार सचिन पाटील, रामभाऊ सातपुते, धैर्यशील कदम, प्रल्हादजी साळुंखे, बाळासाहेब सोळसकर, जिजामाला नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
फडणवीस म्हणाले, की येथील विरोधक नालायक म्हणून आम्हाला मते द्या, असं मी म्हणणार नाही. आम्ही चांगले आहोत. आम्ही चांगलं करून दाखवणार आहे. आमचे नगराध्यक्ष चांगले काम करून दाखवणार आहेत. सकारात्मकपणे सगळे प्रकल्प आम्ही केले आहेत आणि म्हणून आम्हाला तुमचं मत हवे आहे. तुमचे एक सकारात्मक मत हे निश्चितपणे फलटण शहराला सगळ्यात आधुनिक शहर बनवू शकतो. म्हणून मतदान करताना योग्य निर्णय घ्या असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा – आमदार, खासदारांच्या पत्रांना वेळेत उत्तर द्या; सरकारचे अधिकाऱ्यांना निर्देश
फडणवीस म्हणाले, की २०१४ ला ज्यावेळी नरेंद्र मोदी देशाचे पहिल्यांदा पंतप्रधान झाले, त्यावेळी त्यांनी सांगितले की, भारत गावांमध्ये राहतो तसा शहरांमध्येही राहतो. देशाच्या एकूण जीडीपीचा ६५ टक्के भाग हा शहरामध्ये तयार होतो. वस्तू आणि सेवांची, रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते. आपण शहरे चांगली केली, शहरांमध्ये राहणारा गरीब, शहरामध्ये राहणारा मध्यमवर्गीय यांना चांगल्या प्रकाराची व्यवस्था आपण उभी केली.
छोटी शहरे यांच्यात रोजगाराच्या संधी देखील वाढतील आणि म्हणून पहिल्यांदा आपल्या देशामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरांचा विचार करत स्मार्ट सिटीची योजना, अटल अमृत शहराची योजना, स्वच्छ भारत शहरी मिशन, प्रधानमंत्री आवास योजना मोदी यांनी सुरू केल्या. त्याकरता कोट्यवधी रुपये मोदींनी खर्च केले. लाडक्या बहिणी बरोबर महाराष्ट्रात एक कोटी लखपती दीदी योजना राबवली जात आहे.
राजकीय जीवनात टीका-टिप्पणी होते, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. या गोष्टीचे अतिशय दुःख आहे की, एका डॉक्टर तरुणीने एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आपलं जीवन संपवलं. त्या कोणाकडून पीडित होत्या, ते सगळं आता तपासात बाहेर आलेले आहे. पण या परिस्थितीचे भांडवल करायचे, त्याचं राजकारण करायचे आणि मग त्या आधारावर कोणाला तरी लक्ष्य करायचं या गोष्टी राजकारणात चांगल्या नाहीत. शेवटी तपास पूर्ण झाला. पण मी अतिशय स्पष्टपणे सांगतो, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा दुरान्वये याच्याशी कुठलाही संबंध आलेला नाही. याचा तपास पूर्ण झाला असून, लवकरच आरोपींना शिक्षा होईल.





