PCMC: प्रस्तावित TP Scheme रद्द होण्यासाठी चऱ्होली ग्रामस्थांची ‘बंद’ची हाक
चऱ्होलीत शुक्रवारी कडकडीत बंद; ग्रामस्थ जन आंदोलन उभारणार

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेने जाहीर केलेल्या चऱ्होली येथील प्रस्तावित नगररचना (TP Scheme) योजनेविरोधात जनआंदोलन तीव्र होऊ लागले आहे. चऱ्होलीमध्ये शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे, अशी माहिती माजी महापौर नितीन काळजे यांनी दिली.
महापालिकेच्या वतीने चऱ्होली येथे नगररचना योजना प्रस्तावित आहे. नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे चिखलीतील योजना रद्द करण्यात आली. मात्र, चऱ्होलीतील योजना कायम ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. टीपी रद्द करण्यासाठी आंदोलने सुरू आहेत.
भाजपाचे भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे, तसेच विविध राजकीय पक्षांनी प्रशासनाशी संवाद साधला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी काही स्थानिकांनी संपर्क साधला होता. त्यानंतर सोमवारपर्यंत निर्णय अपेक्षित होता. मात्र, अजूनही निर्णय झालेला नाही. यासंदर्भातील श्रेयवाद सोशल मीडियावर रंगला होता. निर्णय न झाल्याने चऱ्होलीकरांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला.
ग्रामस्थांची बैठक झाली आणि त्यामध्ये शांततेच्या मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे येत्या शुक्रवारी चन्होली परिसरात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. लवकर निर्णय घ्यावा.
-नितीन काळजे, माजी महापौर, पिंपरी-चिंचवड.