भाजपने गाफील ठेवले, आता त्यांना धडा शिकवणार; उदय सामंतांचा भाजपवर हल्लाबोल

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
भाजपसोबत युती करण्यासाठी शिवसेना (शिंदे) पक्षाने प्रचंड मेहनत घेतली. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले, मात्र भाजपने आम्हाला गाफील ठेवत युती केली नाही, असा गंभीर आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. ही निवडणूक शिवसेना (शिंदे) सोबत झालेल्या विश्वासघाताची आणि भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधातील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी वाकड येथे सामंत यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते.
उदय सामंत म्हणाले, की भाजपने गाफील ठेवले. युती केली नाही. त्यानंतरी शेवटच्या तासाभरात ५७ ठिकाणी ताकदीचे उमेदवार दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणाचाही महापौर होणार नाही. प्रचारात टीका-टिप्पणी करण्यापेक्षा निवडून आल्यावर काय कामे करणार आहोत. हे जनतेला सांगावे. समोरच्यावर टीका करु नये, कोणाची उणीदुणी काढू नये. स्वत:ला कमकवूत समजायचे नाही. समोरच्याला कमकूवत समजावे. स्वबळावर लढत असलो, तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पूर्ण ताकद सर्व उमेदवारांच्या पाठिशी आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांना भुईसपाट करायचे आहे.
हेही वाचा : लोकशाहीच्या ज्वालेला प्रज्वलित करणारी अग्निशमन विभागाची मतदान जनजागृती रॅली!
पिंपरी-चिंचवडसाठी शिंदे यांचे मोठे योगदान आहे. शास्तीकर माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे शास्तीकराचे श्रेय कोणी घेऊ नये. शिवशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई आहे. समोर धनाढ्य लोक आहेत. आपल्याकडे संघर्ष करणारा शिवसैनिक आहे. संघर्ष करणारा शिवसैनिक धनशक्तीला भुईसपाट करुन जिंकला आहे. शेवटच्या तीन दिवसात दबाव, दादागिरीचे राजकारण केले जाऊ शकते. या सगळ्या गोष्टीसमोर छातीठोकपणे उभे रहावे. शिवसेनेच्या उमेदवारांनी कोणालाही घाबरु नये, असे आवाहनही त्यांनी केले.
शिवसेना (शिंदे) पक्ष भाजप सोबत असता, तर काही लोकांची ढाल बनलो असतो. पण, त्यांना शिवसेना नकोच आहे. त्यामुळे लाचारी करायची देखील काही गरज नव्हती. स्वबळावर लढून शिवसैनिकांना न्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. युतीमध्ये नीलेश या नावाने वादळ उठले. त्यामुळे नीलेश तरस यांची पॅनेल निवडून आणण्याची जबाबरी आहे, असंही उदय सामंत म्हणाले.




