‘नगरपालिका भ्रष्टाचाराचे अड्डे होऊ देऊ नका’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा : भारतीय जनता पक्षाने नेहमीच पारदर्शकतेला प्राधान्य दिले असून पारदर्शक कारभार केला तरच यापुढे जनता निवडून देणार आहे. नगरपालिकेचा कारभार ठेकेदारमुक्त करुन ते भ्रष्टाचाराचे अड्डे होवू देऊ नका, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेद्र फडणवीस यांनी सातारा येथे केले.
भारत जनता पक्षाच्यावतीने जिल्ह्यात निवडून आलेल्या भाजप नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात करण्यात आला. याप्रसंगी ना. फडणवीस बोलत होते.
यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामपंचायत व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर, माजी आमदार मदन भोसले, आनंदराव पाटील, सुनिल काटकर, सत्यजितसिंह पाटणकर, डी. एम. बावळेकर, धैर्यशील कदम, विक्रम पावसकर, सागर शिवदास, अमित चव्हाण, चित्रलेखा माने-कदम, सुरभी भोसले, मनोहर शिंदे, राजू भोसले, वसंतराव मानकुमरे, लक्ष्मीताइ कराडकर, डॉ. प्रिया शिंदे, विकास गोसावी यांच्यासह भाजपचे नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारदर्शक कारभार ठेवत सर्वसामान्यांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. राज्यातही आम्ही पारदर्शकतेला प्राधान्य दिले असल्याने मतदारांमध्ये भाजपबद्दल विश्वास अधिक वाढला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकामध्ये भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा पुढे आला आहे. लाेकांनी आपल्याला संधी देत आपल्यावरील जबाबदारी आणखी वाढवली आहे.
हेही वाचा – नवीन वर्षाची शेतकऱ्यांना भेट! राज्य सरकारचा मोठा निर्णय; 2 लाखांपर्यंतच्या पीक कर्जासाठी…
नगरपालिकांमधील कारभार पारदर्शक ठेवून विकासाला प्राधान्य द्यावे. ठेकेदार नगरपालिका चालवतात असे चित्र कुठेही दिसता कामा नये. नगरपालिका भ्रष्टाचाराचे अड्डे होवू नयेत यासाठी सर्वांनी लक्ष द्यावे. तुम्ही चांगल्या प्रकारे काम केले तरच जनता तुम्हाला संधी देणार असल्याने जनतेने दिलेल्या संधीचे सोने करा तुम्हाला कुठेही निधी कमी पडू देणार नाही. फलटणमध्ये अटीतटीची मॅच झाली पण सकारत्मक प्रचार यंत्रणा राबवल्याने रणजितसिंह निंबाळकर व समशेरसिंह निंबाळकर यांना यश मिळाले.
फडणवीस पुढे म्हणाले, नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये मी कोणावरही टीका केली नाही. केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामाची पोहोचवती द्या असे आवाहन केले होते. छत्रपतींच्या राजधानीत तर अमोल मोहितेंना राज्यात सर्वाधिक मतांनी नगराध्यक्षपदाची संधी मतदारांनी दिली. जिल्ह्यात पहिल्यांदाच खूप मोठे यश पक्षाला मिळाले. भारतीय जनता पक्षाने आपल्यासारख्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या जीवावर १३० नगराध्यक्ष आणि तीन हजार पेक्षा जास्त नगरसेवक निवडून देत इतिहास घडवला.
भाजपला मिळालेली मते आणि सर्व विरोधी पक्षांना मिळालेली मते यांची बेरीज केली तर भाजपला आता गाठणे सोपे नाही हे विरोधकांना दाखवून दिले आहे. भाजप हा पुन्हा एकदा एक नंबरच पक्ष ठरला असून भाजपने महाराष्ट्रामध्ये ७५ टक्के जागा जिंकलेल्या आहेत. आपल्याला मिळालेला एक एक पैसा हा जनतेचा आहे आणि तो चांगल्या कामांसाठीच खर्च झाला पाहिजे यासाठी नगराध्यक्ष, नगरसेवक यांनी खबरदारी घ्यावी.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. जयकुमार गोरे व मान्यवरांच्या उपस्थितीत सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, म्हसवड नगराध्यक्षा पूजा विरकर, मलकापूर नगराध्यक्ष तेजस सोनावणे, वाइ नगराध्यक्ष अनिल सावंत, रहिमतपूर नगराध्यक्ष वैशाली माने, मेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष रुपाली वारागडे, फलटण नगराध्यक्ष समशेरसिंह ना. निंबाळकर, कराडचे भाजप नगरसेवक, पाचगणीच्या लक्ष्मीताइ कराडकर व त्यांचे समर्थक नगरसेवक, महाबळेश्वरचे डी. एम. बावळेकर, रविंद्र कुंभारदरे, वडूजच्या नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे व सर्व नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.




