To The Point : सीमाताई विसरल्या; पण सुलक्षाताईंनी आवाज उठवला!
माता रमाई स्मारक : सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजुर करा अन् काम सुरू करा!
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी ।
संघर्ष, त्याग आणि अढळ प्रेमाची मूर्ती असलेल्या, आमच्या माऊली माता रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन, असे भावनिक शब्दांत माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी अभिवादन केले. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक संघर्षात, चळवळीत आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात रमाई आंबेडकर अखेरपर्यंत खंबीरपणे त्यांच्या सोबत उभ्या राहिल्या. वात्सल्य आणि करुणेचे प्रतीक असलेले रमाईंचे आदर्शवत विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
पिंपरी-चिंचवडमधील आंबेडकरी समाजाच्या अस्मितेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकाचा प्रस्ताव तात्काळ सर्वसाधारण सभेत मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी ठाम मागणी सुलक्षणा शिलवंत-धर यांनी केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या शेजारी माता रमाई आंबेडकर स्मारक प्रस्तावित असून, महापालिका निवडणुकीच्या काळात सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने स्मारक उभारणीचे आश्वासन दिले होते. हे स्मारक केवळ वास्तू नसून समाजाच्या अस्मितेचा विषय असल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी येत्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर करून काम सुरू करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रस्तावित सुधारित विकास आराखड्यात माता रमाई स्मारकाचा स्पष्ट उल्लेख नसल्याचा दावा करत माजी नगरसेविका सीमा सावळे यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलनाचा इशारा दिला होता. विधानसभा निवडणुकीच्या काळातही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र आज माता रमाई आंबेडकर यांची जयंती असतानाही सीमाताईंनी अभिवादनाची साधी सोशल मीडिया पोस्टदेखील केली नाही. किंबहुना, माता रमाई आंबेडकर स्मारकाबाबत त्यांची भूमिका ही केवळ राजकीय स्टंटबाजीपुरतीच मर्यादित होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
“माता रमाई आंबेडकर यांचे स्मारक ही केवळ वास्तू नाही, तर आंबेडकरी समाजाच्या संघर्ष, त्याग आणि अस्मितेचे प्रतीक आहे. हे स्मारक उभारण्यासाठी सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. माता रमाईंच्या विचारांना आणि योगदानाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील. महापालिकेतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नेत्यांनी याकामी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आहे.
— सुलक्षणा शिलवंत-धर, माजी नगरसेविका.




