Inside Story : … म्हणून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी ‘‘ती’’ बैठक सोडली!
उपमहापौर नियुक्तीवरुन ठिणगी : राष्ट्रवादीत बाहेरचा विरुद्ध स्थानिक वाद पुन्हा पेटला?
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी ।
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील महापौर, उपमहापौर आणि सत्तारुढ पक्षनेत्यासह विरोधी पक्षनेत्यांची निवड झाली. मात्र, ही निवड होत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही काहीअंशी नाराजीनाट्य समोर आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी उपमहापौर नियुक्तीपूर्वी झालेल्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करीत बैठक सोडली होती. त्याचे कारण आता समोर आले आहे.
राज्यातील सत्तेत प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढली. ही लढत मैत्रीपूर्ण होईल, असा दुजोरा त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातच दिला होता. पण, निवडणूक स्थानिक पातळीवर अत्यंत चुरशीची आणि आरोप-प्रत्यारोपांची झाली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. कारण, अजितदादांना महापालिकेत निर्णायक संख्याबळ तयार करायचे होते. निवडणूक झाल्यानंतर ‘‘महायुती’’ म्हणून पुन्हा भाजपा+ राष्ट्रवादी+ शिवसेना एकत्रित सत्ता स्थापन करण्याचे नियोजन होते. कारण, महाविकास आघाडी किंवा विरोधकांना ‘पॉलिटीकल स्पेस’ मिळू नये. यासाठी हा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला होता, असे सांगितले जाते.
‘‘सत्तेत सहभागी झाल्याशिवाय विकासकामे करता येणार नाही. कार्यकर्त्यांना ताकद देता येणार नाही..’’ हे सूत्र दिवंगत अजितदादांना पूर्णपणे ज्ञात होते. त्यामुळेच त्यांनी 2023 मध्ये भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. कारण, 2017 मध्ये महापालिका निवडणूक झाली. त्यानंतर 4 वर्षे प्रशासकीय राजवट झाली. म्हणजे गेली 9-10 वर्षे राष्ट्रवादीचे 36-37 नगरसेवक विरोधात आहे. जे भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेतृत्त्वाविरोधात निकराने लढत आहेत. आता पुढील पाच वर्षे पुन्हा विरोधात म्हणजे सुमारे 14 वर्षे विरोधात बसण्याचा वनवास राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना भोगावा लागणार आहे. किंबहुना, पराभूत झालेल्या उमेदवारांना पूर्ण बहुमत असलेल्या भाजपाविरोधात 5 वर्षे प्रभागात अस्थित्व टिकवण्याची लढाई लढावी लागणार आहे.
याबाबत ठोस निर्णय घेण्याची संधी ‘‘उपमहापौर’’ पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने होती. त्यासाठी दिवंगत अजितदादा पवार यांचे निष्ठावंत आणि विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत ‘‘राष्ट्रवादीने उपमहापौरपद घ्यावे आणि सत्तेत सहभागी व्हावे. राज्यात आणि केंद्रात पक्ष सत्तेत आहे. स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद सक्षम ठेवण्यासाठी आणि पदाधिकारी-नगरसेवक- कार्यकर्त्यांना बळ देवून पक्ष संघटन प्रभावी करावे, अशी ठाम भूमिका शहराध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी मांडली.
योगेश बहलांच्या प्रस्तावाला स्थानिकांचा विरोध…
गेली 9 वर्षे आणि पुढील 5 वर्षे असे एकूण 14 वर्षे विरोधात आणि संघर्षमय वाटचालीमध्ये राष्ट्रवादीतील ताकदीच्या कार्यकर्त्यांची एक फळी प्रभावित होईल. विरोधात बसून, राष्ट्रवादी नवी फळी तयार करता येणार नाही. कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना ताकद देता येणार नाही. राज्यात आणि केंद्रात सत्तेत असतानाही अजितदादांनी भाजपाच्या चुकीच्या कामाला विरोध केला. तसेच, आपण शहरात सत्तेत सहभागी होवू आणि भाजपाच्या चुकीच्या कामांना उघडपणे विरोध करण्याची भूमिका घेवू…’’ असा प्रस्ताव योगेश बहल यांनी ठेवला. पण, त्याला तीव्र विरोध करण्यात आला.
…योगेश बहल राष्ट्रवादीत एकाकी..?
राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह स्थानिक काही दिग्गजांनी योगेश बहल यांच्या भूमिकेला बैठकीत विरोध केला. ‘‘भाजपासोबत सत्तेत सहभागी व्हायचे नाही… अन्यथा आम्ही सर्वजण बाहेर पडतो…’’ अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतली. यावर, विरोधात बसून पक्षाचा फायदा नाही. कार्यकर्ते-नगरसेवकांची कामे होणार नाहीत. आपण बदलत्या राजकीय समीकरणांनुसार निर्णय घेतले पाहिजेत. ‘‘माझा तुम्हाला त्रास होत असेल, तर मीच बाहेर पडतो…’’ अशी नाराजी योगेश बहल यांनी व्यक्त केली आणि त्यानंतर त्यांनी बैठक सोडली आणि तिथून बाहेर पडले. त्यानंतर बैठकीत स्थानिक आणि बाहेरचा असा जुना वाद पुन्हा उफाळून आला. भाजपासोबत सत्तेत सहभागी व्हायचे नाही, ही भूमिका घेण्यात आली. राष्ट्रवादीत योगेश बहल एकाकी पडले, तर भाऊसाहेब भोईर आणि अन्य सहकाऱ्यांनी विरोधात बसून काम करण्याचा निर्णय घेतला.




