To The Point : आमदार लांडगे संकल्पित ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ पासून राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ!
विधानसभा निवडणुकीत टीका केली त्याच स्मारकासमोर महापालिकेसाठी प्रचाराची सुरूवात!
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. राज्यातील सत्ताधारी भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा खडा सामना आहे. भाजपाच्या काळात भ्रष्टाचार झाला आणि अनागोंधी कारभार झाला किंबहुना, विकासकामे झाली नाहीत, असा दावा दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिखली- तळवडेतील जाहीर सभेत केला.
‘‘महापालिका कर्जबाजारी झाली आणि विकासकामे झाली नाहीत, ’’ असा आरोप सातत्त्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्त्वाकडून केला जातो. विधानसभा निवडणूक- 2024 मध्ये शहराच्या राजकारणात ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ चा मुद्दा प्रचंड गाजला. या मुद्यावर भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना चांगलेच ‘‘टार्गेट’’ करण्यात आले. पुतळ्याच्या मोजडीला तडे गेले आहेत आणि त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, असा दावा केला जात होता.
दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मोशी प्रभाग- 2 मधील राष्ट्रवादीच्या पॅनेलने प्रचाराचा शुभरंभ करण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ येथूनच प्रचाराची सुरूवात करण्यात येणार आहे. ज्या पुतळ्यावर विधानसभा निवडणुकीत आरोप केले. त्याच ठिकाणी राष्ट्रवादीला प्रचाराचा नारळ फोडावा लागतो. मग, केलेले आरोप चुकीचे होते की, आता प्रचाराचा होणारा शुभरंभासाठीचे ठिकाणी मिळाले नाही? असा सवाल भाजपा कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे.
मोशी येथील राष्ट्रवादीच्या पॅनेलचा उद्या प्रचार शुभारंभ होतो आहे. श्री. नागेश्वर महाराज मंदिरातून प्रचारांचा शुभारंभ होईल. पण, त्यापूर्वी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वांत उंच शिल्प ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ येथे राष्ट्रवादीचे उमेदवार अभिवादन करतील आणि त्यानंतर प्रचाराला सुरूवात होणार आहे. भाजपा सत्ताकाळात कामे झाली नाहीत, असा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना शंभू राजांना अभिवादन करताना हे स्मारक भाजपा सत्ताकाळात उभारले आहे, याची जाणीव होईल, असा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे.




