To The Point : आळंदीतील संजीवन समाधी सोहळ्याला खासदार अमोल कोल्हे यांची अनुपस्थिती!
महाराष्ट्रभरातून वारकरी आळंदीत, मात्र, कोल्हे फिरकलेही नाहीत
पुणे । विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सार्वजनिक कार्यक्रमांकडे पाठ फिरवली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण, कार्तिकी वारी तसेच उत्पत्ती एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून श्रीक्षेत्र आळंदी येथे हजारो वारकरी दाखल झाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी सोहळा झाला. या ठिकाणी परंपरेप्रमाणे पूजा- अर्चना झाली. मात्र, या सोहळ्याकडे खासदार कोल्हे यांनी पाठ फिरवली.
परंपरेनुसार, हैबतबाबा यांच्या पायरीपुजनाने संजीवन समाधी सोहळ्याला सुरूवात झाली. दि. २३ नोव्हेंबर ते दि. १ डिसेंबर या काळात हा सोहळा संपन्न झाला. यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथून श्रींची पालखी आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाली. दि. १ डिसेंबर रोजी रात्री छबिना मिरवणुकीने या सोहळ्याची सांगता झाली. भजन, कीर्तन, महापूजा, पारायण झाले.
राज्यात दि. २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा दारुन पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये निवडून आल्यानंतर डॉ. कोल्हे मतदार संघात फिरत नाहीत. लोकांमध्ये जात नाही. किंबहुना, विकासकामांकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप राजकीय नेत्यांकडून झाला. असे असतानाही, महाविकास आघाडीच्या सहानुभूतीच्या लाटेत २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत डॉ. कोल्हे विजयी झाले. मात्र, त्यांनी आपली कार्यपद्धती बदललेली नाही, अशी टीका वारकरी सांप्रदाय आणि राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.
खासदार डॉ. कोल्हे यांचा बेगडीपणा…
महाविकास आघाडीचे ‘सेलिब्रेटी’ खासदार अशी डॉ. कोल्हे यांची ओळख आहे. ‘सोशल मीडिया’वर प्रचंड ॲक्टिव्ह असलेल्या कोल्हे यांना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी सोहळानिमित्त एखादी धावती भेट करावी, असे वाटले नाही. केवळ सोशल मीडियावर पोस्ट केली आणि सोपस्कार केले, असे चित्र आहे. वास्तविक, दि.२० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले. त्यानंतर सोशल मीडियावर डॉ. कोल्हे यांनी ‘‘ महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी मतदान करणाऱ्या मतदारांचे आभार मानतो’’ असा दावा केला. मात्र, संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या श्रीक्षेत्र आळंदीतील संजीवन समाधी सोहळ्याचा त्यांना विसर का पडला असावा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वारकरी सांप्रदाय, संत-महात्म्ये महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय नाहीत का? की डॉ. कोल्हे महाराष्ट्र धर्म आणि स्वाभिमानाची बेगडी भाषा करीत आहेत, असा संताप वारकरी सांप्रदाय आणि राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.





