To The Point: भाजपातून बाहेर पडलेले माजी नगरसेवक सरसकट पराभूत!
मिशन- PCMC : सीमा सावळे, वसंत बोराटे यांच्यासह मातब्बरांचा धक्कादायक पराभव
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या माजी महापाैर उषा ढाेरे, उपमहापाैर सचिन चिंचवडे, माजी सभागृह नेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, संताेष लाेंढे, सीमा सावळे यांना धक्कादायकपणे पराभवाला सामाेरे जावे लागले. माजी महापाैर शकुंतला धराडे, माजी विराेधी पक्षनेत्या सुलभा उबाळे पुन्हा सभागृहात आल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ३२ प्रभागांमध्ये १२८ जागांसाठी निवडणूक झाली. भाजपचे रवी लांडगे, सुप्रिया चांदगुडे बिनविरोध निवडून आल्याने १२६ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत भाजपचे ८४, राष्ट्रवादीचे ३७, शिवसेना (शिंदे) पक्षाचे ६ तर १ अपक्ष असे १२८ नगरसेवक निवडून आले आहेत. पक्षांतर केलेले २८ नगरसेवक विजयी झाले असून पक्षांतर करणाऱ्या ११ जणांवर पराभवाची नामु्ष्की ओढावली.
शहरात २८ आयाराम विजयी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातून भाजपमध्ये गेलेले जालिंदर शिंदे, कुशाग्र कदम, प्रवीण भालेकर, शरद मिसाळ, आशा सूर्यवंशी, अपर्णा डाेके, विनाेद नढे, राहुल कलाटे, शकुंतला धराडे, शाम जगताप, नवनाथ जगताप, प्रशांत शिताेळे विजयी झाले. शिवसेना (ठाकरे) पक्षातून भाजपमध्ये गेलेले रवी लांडगे, तुषार सहाने, रिटा सानप, शिवानी नरळे, अमित गावडे, संजय काटे यांनी विजय साकारला. भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात गेलेल्या भिमाबाई फुगे, अरूणा लंगाेटे, शेखर चिंचवडे, सविता आसवाणी, संदीप वाघेरे, दिप्ती कांबळे यांनी विजय संपादन केला. शिवसेना (शिंदे) पक्षातून राष्ट्रवादीत गेलेले प्रमाेद कुटे, अनंत काेऱ्हाळे, जितेंद्र ननावरे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातून शिवसेना (शिंदे) पक्षात गेलेल्या रेश्मा कातळे विजयी झाले आहेत.
पक्षांतर केलेल्या ११ जणांवर पराभवाची नामुष्की
शिवसेन (ठाकरे)पक्षातून राष्ट्रवादीत गेलेल्या साधना काशीद, रूपाली आल्हाट, रेखा दर्शिले, भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात गेलेल्या अश्विनी जाधव, सीमा सावळे, धनंजय काळभाेर, अश्विनी चिंचवडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या अनुराधा गाेफणे, प्रसाद शेट्टी, उषा वाघेरे, शिवसेना (ठाकरे )पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या मीनल यादव यांना पराभवाला सामाेरे जावे लागले.
चार शहराध्यक्ष जिंकले, तिघांचा पराभव
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (अजित पवार) शहराध्यक्ष याेगेश बहल, भाजपचे शत्रुघ्न काटे, रिपाईचे कुणाल वाव्हळकर, शिवसेना (शिंदे) नीलेश तरस या चार शहराध्यक्षांनी विजय साकारला. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) पक्षाचे तुषार कामठे, आपचे रविराज काळे यांचा पराभव झाला.
पती-पत्नीच्या जाेड्यांना नाकारले
महापालिका निवडणुकीत तीन प्रभागातून तीन पती-पत्नी निवडणूक रिंगणात हाेते. त्यापैकी मनसेचे माजी नगरसेवक सचिन चिखले आणि माजी नगरसेविका अश्विनी चिखले यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक माेरेश्वर भाेंडवे आणि जयश्री भाेंडवे या दाेघांनाही पराभवाला सामाेरे जावे लागले. माजी विराेधी पक्षनेते नाना काटे यांचा विजय झाला असून त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका शितल काटे यांचा पराभव झाला आहे.
खासदार, आमदारांचे पुत्र सभागृहात
खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजीत बारणे आणि राष्ट्रवादी काॅंग्रसचे आमदार सिद्धार्थ बनसाेडे हे पहिल्यांदाच महापालिका सभागृहात नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. माजी आमदार विलास लांडे यांचे पुतणे विराज हेही प्रथमच निवडून आले आहेत.





