“प्रसंग कठीण होता, पण…”, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर, आज (शनिवार) त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. मुंबईतील लोकभवन येथे साध्या पद्धतीने हा शपथविधी पार पडला. दरम्यान हा शपथविधी झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत सुनेत्रा पवार यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक केले आहे. हा शुभेच्छा देण्याचा प्रसंग नसल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, “प्रसंग कठीण होता… पण, ज्या धीरोदात्तपणे श्रीमती सुनेत्रावहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे.”
हेही वाचा – अजित पवारांच्या आईची परवानगी घेऊन सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना!
तसेच अजित पवारांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार असल्याचेही मु्ख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले आहे. “शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही… आपण, अजितदादांचा वारसा त्या (सुनेत्रा पवार) समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास आहे. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकीर्द यशस्वी ठरेल. भाजपा आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी, आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पोस्ट करत सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केले आहे. “महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील,” असे मोदी म्हणाले आहेत.
राज्याच्या ११ व्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही तीन खाती देण्यात आली आहेत. तर अजित पवारांचे नियोजन आणि वित्त ही खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहेत.




