‘‘महाईन्यूज’’च्या वृत्ताचा परिणाम : …. अखेर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल नरमले!
राजकीय सारवासारव : माजी आमदार विलास लांडे यांना शुभेच्छांची थेट ‘प्रेसनोट’ काढली!
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष योगेश बहल यांनी अखेर माजी आमदार विलास लांडे यांच्या नियुक्तीबाबत अधिकृत प्रेसनोट काढली आणि शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यामुळे शहराध्यक्ष बहल अखेर नरमले असून, राजकीय सारवासारव करीत आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
विधानसभा निवडणूक- 2024 मध्ये तत्कालीन शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे अजित पवार यांनी शहराध्यक्षपदी योगेश बहल यांची नियुक्ती केली होती. नंतरच्या काळात गव्हाणे पुन्हा अजित पवार गटात प्रवेशकर्ते झाले.
दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला स्थानिक पातळीवर प्रभावी चेहरा हवा… अशा प्रकारचे वृत्तांकन ‘महाईन्यूज’ने केले होते. त्याची प्रदेश पातळीवर दखल घेण्यात आली आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक प्रचार प्रमुखपदी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांची, तर जिल्हा निवडणूक समन्वयकपदी माजी आमदार विलास लांडे यांची नियुक्ती करण्यात आली.
तत्पूर्वी, दि. 10 नोव्हेंबर 2025 रोजी योगेश बहल यांनी शहराची कार्यकारिणी जाहीर केली होती. या कार्यकारिणीत माजी आमदार विलास लांडे यांचा उल्लेख ‘मुख्य समन्वयक’ आणि नाना काटे यांचा उल्लेख ‘मुख्य संघटक’ असा होता. सदर पत्रकार परिषदेला लांडे उपस्थित राहीले नाहीत. ‘‘शहराचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेले नेते बहल यांच्या हाताखाली काम करणार आहेत का?’’ असा गंभीर संदेश यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये गेला. याबाबतही ‘महाईन्यूज’ने सडेतोड वृत्तांकन केले. त्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली.

परिणामी, नाना काटे आणि विलास लांडे यांना निवडणुकीच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका देण्यात आली. दि.16 नोव्हेंबर 2025 रोजी ही नियुक्ती झाली. मात्र, योगेश बहल यांनी साधी अभिनंदनाची पोस्टही केली नाही. शहरातील राजकीय घडामोडींवर ‘बारिक लक्ष’ असलेल्या ‘महाईन्यूज’ पुन्हा दणका दिला. ‘‘योगेश बहल यांना भूमिपुत्रांबाबत ‘‘आकस’’ भावना…’’ अशा मथळ्याने धडाकेबाज वृत्त प्रसिद्ध झाले. दि. 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी वृत्त प्रसिद्ध झाले आणि त्याची दखल घेत सायंकाळी बहल यांनी माजी आमदार विलास लांडे यांच्या नियुक्तीबाबत आणि शुभेच्छांबाबत अधिकृत ‘प्रेसनोट’ काढली.

राष्ट्रवादीसमोर गळती रोखण्याचे आव्हान…
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीतील काही बडे मासे गळाला लावले आहेत. गत निवडणुकीत 35 नगरसेवक संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादीतून अनेकजण यावेळी भाजपातून चाचपणी करीत आहेत. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा निकाल दि. 3 डिसेंबर रोजी होईल. त्यानंतर पहिल्या टप्प्यात शहरातील भाजपा प्रवेशाचा जाहीर कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीला धक्का देण्याचे नियोजन भाजपा नेत्यांनी केले आहे. त्यामुळे मुख्य समन्वयक विलास लांडे आणि प्रचार प्रमुख नाना काटे यांना संभाव्य गळती रोखण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. दुसरीकडे, भाजपामध्ये ज्यांना संधी मिळणार नाही, त्यांना गळ घालण्याची तयारी राष्ट्रवादीनेसुद्धा केली आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.





