भाजपा नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांच्या तत्पर पाठपुराव्यामुळे दुर्घटना टळली!
आदिनाथ नगर सुखवानी रेसिडेन्सी परिसरात ट्रान्सफॉर्मरला आग

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
आदिनाथ नगर येथील सुखवानी रेसिडेन्सी सोसायटी परिसरात MSEDCL च्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे आणि प्रशासनाच्या तत्काळ प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळला.
या घटनेची माहिती मिळताच नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत परिस्थितीची गंभीर दखल घेतली. त्यांनी अग्निशमन दल व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तातडीने उपाययोजना राबविण्यासाठी पाठपुरावा केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ दाखल होत आग विझविण्याचे काम सुरू केले आणि अल्पावधीतच आगीवर नियंत्रण मिळवले. या वेळी परिसरातील नागरिकांची सुरक्षितता हीच प्राथमिकता ठेवण्यात आली.
हेही वाचा
एकतर्फी निर्णय घेतला, तर कचरा आयुक्तांच्या दालनात टाकू!
नगरसेविका सोनाली गव्हाणे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तसेच प्रशासनाच्या जलद कार्यवाहीमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे स्थानिक नागरिकांनीही नमूद केले. नागरिकांनी प्रशासनाच्या तत्पर प्रतिसादाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. या घटनेनंतर परिसरातील वीज यंत्रणेची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
“आदिनाथ नगर सुखवानी रेसिडेन्सी परिसरातील ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीची माहिती मिळताच मी तातडीने संबंधित MSEDCL व अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. नागरिकांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याने सर्व यंत्रणांनी समन्वयाने त्वरित कार्यवाही केली आणि काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वीज यंत्रणेची सखोल तपासणी व आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करणार आहोत.”
– प्रा. सोनाली गव्हाणे, नगरसेविका.





