‘‘पहिला सत्कार पक्षसंघटना वाढीसाठी अन् कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी’’ : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी घेतली भेट : दि.24 जुलै रोजी शहरात अभिष्ठचिंतन सोहळा
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी : नुसत्या सत्कारापेक्षा पक्षाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी येतो. ‘‘पिंपरी-चिंचवडमधील पहिला सत्कार पक्ष संघटना वाढीसाठी अन् कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी होईल..’’ महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी अडचणी, प्रश्न असतील त्या ठिकाणी जाऊन प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी आमचा प्रयत्न राहणार आहे, अशा भावना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची निवड झाली आहे. या निमित्ताने पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी त्यांची भेट घेतली. तसेच, दि. 24 जुलै 2025 रोजी चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे अभिष्ठचिंतन सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्याचे निमंत्रण प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी स्वीकारले. यावेळी माजी नगरसेवक गणेश भोंडवे आणि सहकारी उपस्थित होते.
पुरोगामी विचारांचा वारसा चालवणार : शशिकांत शिंदे
पुरोगामी विचारांचा वसा आणि वारसा घेऊन महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकरी बांधवांच्या हितासाठी लढणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष. या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी विश्वासाने दिली. त्यांच्या या विश्वासाला न्याय देत हा वारसा सक्षमपणे चालवण्याचा आम्ही संकल्प केला आहे, असे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पुरोगामी विचारांना मानणारा वर्ग मोठा आहे. शहराच्या विकासामध्ये राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी योगदान दिले आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये आमचा पक्ष पूर्ण ताकदीने लढेल आणि जिंकेल, यात शंका नाही. नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा उभा करणार आहोत.
– तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष.





